
सामना प्रतिनिधी । सेलू
सेलू येथील शंभू नगरमध्ये आज सकाळी १०.३० वाजता एका घरात महिलेला एकटी पाहून चोरट्याने त्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून चोरीचा प्रयत्न केला. परंतु महिलेने धाडस दाखवून आरडाओरड केल्याने चोरटा पसार झाला व पुढील अनर्थ टळला. या प्रकारामुळे महिलावर्गात मात्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील शंभू नगर मधील जि.प. शिक्षक लिंबाजी चौधर हे सकाळी शाळेत गेल्यानंतर त्यांच्या पत्नी घरी एकट्याच होत्या. सकाळी १०.३०.वा एक तरुण तोंडाला रुमाल बांधून ‘मी कृषी शाखेचा (अॅग्रीचा) विद्यार्थी आहे. तुमच्याकडे भाड्याने खोल्या मिळतील का?’ असे विचारून घरात शिरला. त्या चोरट्याने चौधर यांच्या पत्नीच्या दूरध्वनीवरून शाळेत गेलेल्या लिंबाजी चौधर यांनाही संवाद साधला आणि खोली पाहण्याच्या निमित्ताने आत गेल्यानंतर त्याने चौधर यांच्या पत्नीचा हात पिरगाळून सरळ गळ्याला चाकू लावून घरातून सोने व पैसे दे म्हणून धमकी दिली. परंतु चौधर यांनी धाडस दाखवून त्या चोरट्याला जोरात ढकलून बाहेर येऊन आरडाओरडा केल्यानंतर गल्लीrतील ज्येष्ठ नागरिक गंगाधर बदाले, शेळके आदीसह अनेकांनी धाव घेतल्याने त्या चोरट्याने संरक्षक भीतीवरून उडी मारून पळ काढला. नागरिकांनी पाठलाग केला. परंतु चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. सध्या उन्हाळ्याची चाहूल जाणवत आहे. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होत आहे. या पाश्र्वभूमीवर घरातील महिलांनी धाडसाने व सजग राहणे आवश्यक आहे.घडल्या प्रकाराने मात्र परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


























































