
गणेशोत्सवानिमित्त चिराबाजार ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती सर्व बाळ गोपाळांनी तयार केल्या. युवासेना उपसचिव प्रथमेश पांडुरंग सकपाळ व जायंट ग्रुप ऑफ चौपाटी यांच्या वतीने विभागातील लहान मुलांसाठी बेस्ट आऊट ऑफ वेस्ट या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी कुलाबा विधानसभा प्रमुख पल्लवी सकपाळ, शाखा संघटक माधुरी पेंढारे, युवासेना उपविभाग अधिकारी मिलिंद झोरे, सोशल मिडिया महाराष्ट्र समन्वयक अमित भाद्रीचा व मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना तसेच सहभागी झालेल्या सर्व मुलांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
शिवसेना नेते अनंत गीते यांनी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या ‘विलेपार्लेचा मोरया’ अर्थात ‘विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’च्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत दहावीत 74.70 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल पुढील शिक्षणासाठी यशस्वी संजय चांडीवकर हिला आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. विधानसभाप्रमुख वीणा टॉक, विधानसभा सहसमन्वयक ज्योत्स्ना दिघे, उपविभाप्रमुख संजीवनी घोसाळकर, शाखाप्रमुख संजय साखळे, शाखा संघटक स्वाती तावडे, प्रीती खारवी, मिनाली पाटील, रेश्मा राजन, पोलादपूर तालुका संपर्कप्रमुख सतीश शेलार यांच्यासह मंडळाचे सभासद यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूर यांच्या गणेशोत्सवामध्ये लायन्स क्लब कांजूरच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कांजूर विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मंडळाचे अध्यक्ष तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, अनंत पाताडे, राजू शेटये, सुधीर सावंत, जेकब फ्रान्सिस, प्रमोद पवार, महेश पाताडे तसेच लायन्स क्लब आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूरचे यंदाचे 54 वे वर्ष असून मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
35 हजार महिलांच्या अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रम झाला आहे. तब्बल 35 हजार 215 महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंडमध्ये झाली आहे. जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र सोमवारी मंडळाला सुपूर्द करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरगावच्या उरणकरवाडी गणेशोत्सव मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष; खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन
गिरगावातील उरणकरवाडी गणेशोत्सव मंडळ यंदा शतकमहोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने उद्या, बुधवारी नृत्य दिग्दर्शक हरिष पितळे स्मृती चषक ‘भव्य खुली समूह नृत्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
समूह नृत्याकरिता वयोमर्यादा राहणार नाही. प्रवेश शुल्क शंभर रुपये असून कमीत कमी तीन स्पर्धकांचा समूह असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी दिलेल्या वेळेच्या आधी 15 मिनिटे वेशभूषेसहित हजर राहावे. नृत्य स्पर्धेची एकच फेरी व त्या फेरीमधून अंतिम विजयी स्पर्धक ठरविण्यात येणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी समीर ठाकूर 9819022048 आणि दीपेश रेवर 8108725420 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.