संभाजीनगरात आणखी 24 जणांना कोरोना विषाणूची बाधा; संसर्ग झालेल्यांची संख्या 321 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरात आज सकाळी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता शहरातील बाधितांची संख्या 321 वर पोहोचल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर येळीकर यांनी दिली.

शहरात कोरोना भारी त्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या मंगळवारी शहरातील बाधितांची संख्या अवघी 56 होती. ती मंगळवारी पहाटे 321 वर पोहोचली आहे. यावरून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे असे दिसते. शहरात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याने आणि पोलीस यंत्रणेने नरमाईचे धोरण स्वीकारल्याने कोरोनाचे भूत संभाजीनगरकरांच्या मानगुटीवर बसले आहे. या आठवड्यात शहरातील बाधितांची संख्या तुफानाच्या वेगाने वाढली असून दरदिवशी सरासरी 38 बाधितांनी हा आकडा फुगत गेला आहे. 56 बाधितांच्या तुलनेत ही वाढ तब्बल 67.85 इतकी आहे. नागरिकांचा सोशल डिस्टनसिंगचा हलगर्जीपणा आणि पोलीस तसेच स्थानिक प्रशासनाचे ढिसाळ धोरण यामुळे हे गणित असेच गुणकाराकडे जाऊ पाहात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर हे ऐतिहासिक शहर कोरोनाच्या मागरमिठीत जायला वेळ लागणार नाही.

शहरात कोरोनाचा 11 वा बळी

संभाजीनगरात आज सकाळी 8.30 वाजता 28 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाला 27 रोजी उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाच्या कोविड कक्षाचे नोडल ऑफिसर डॉ. उमर कादरी आणि डॉ. राघवन यांनी दिली. या रुग्णाच्या मृत्यूने शहरातील कोरोनाच्या बळींची संख्या 11 वर पोहोचली असून हे प्रमाण शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येच्या 03.43 इतके आहे तर आजवरच्या कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या संख्येच्या 07.79 इतके आहे.