संभाजीनगरात हातावर पोट असणा-या कुटुंबाना मिळणार ‘इस्काँन’ची खिचडी, महापालिकतर्फे नियोजन

1024

लॉकडाऊनमुळे शहरात हातावर पोट असलेल्या गोर-गरीब नागरिकांचे जेवणा अभावी हाल होवू नयेत म्हणून मनपातर्फे जेवण देण्याची योजना आखण्यात येत आहे. मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. महापौरांवर संपुर्ण योजना राबविण्याचे दायीत्व सोपविण्यात आले आहे.  इस्काँनसोबत करार करुन खिचडी वाटप करण्यासाठी मनपाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरात असंख्य नागरिकांचे हातावर पोट आहे. दिवसभर मेहनत मजूरी केल्याशिवाय घरी चूलच पेटत नाही. कुटुंबातील एका कमवित्या व्यक्तीवर संपुर्ण कुटुंब अवलंबून असते. कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. पुढील 21 दिवस गोर-गरीबांनी उदरनिर्वाह कसा करावा हा मोठा प्रश्न आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. गोर-गरीब नागरिकांचे काय? असा प्रश्न आयुक्तांना भेटसावत होता. त्यांनी मंगळवारी मनपाकडून गोर-गरीबांना जेवण देण्याचा निर्णय घेतला.

आयुक्तांनी आपला एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांच्या पत्नी पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनीही एक महिन्याचा पगार देण्याचे निश्चित केले. या शिवाय मनपा अधिकारी, कर्मचा-यांचा एक दिवसाचा पगार तर नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन घेतले जाणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर ही सर्व जबाबदारी आयुक्तांनी सोपविली. महापौरही आपला सर्वाधिक वाटा या उपक्रमात टाकणार आहेत. एकूण किती रक्कम जमा होणारे हा अंदाज घेवून इस्काँन मार्फत जेवण तयार करून वॉर्ड कार्यालयांमार्फत जेवण वाटप करण्यात येणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. दोन दिवसात ही योजना सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनजीओना एकत्रित करणार
शहरातील विविध संस्था, एनजीओ माफँत अन्नाचे पाकिटे दिली जात आहे. परंतु एकाच भागात ही पाकिटे वाटप केली जात असून गरजू पर्यत पोहचत नाही. त्यामुळे सर्व एनजीओना एकत्रित करुन त्यांना एखाद्या भागाची जबाबदारी सोपवून नियमीतपणे अन्नांची पाकिटे पोहचली जातील असे नियोजन केले जाणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या