संभाजीनगरमध्ये 1 लाख 71 हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार, दहावीसाठी 2 लाख 15 हजार जणांची नोंदणी

802
ssc-exam
प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागीय कार्यालयाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा 1 लाख 71 हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून, दहावीच्या परीक्षेसाठी २ लाख १५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गत वर्षाच्या तुलनेत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागाअंतर्गत संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या पाच जिल्ह्यात उच्च माध्यमिक (बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज झाली. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 ते 17 फेब्रुवारी या दरम्यान आणि लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा विभागातील 406 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे, यासाठी 1 लाख 71 हजार 959 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये मुलींचे संख्या 65 हजार 818 आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी)ची प्रात्यक्षिक परीक्षा 13 फेब्रुवारी ते 2 मार्च 2020 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही 3 ते 23 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 2 लाख 1 हजार 572 विद्यार्थ्यांनी नोंदी केली आहे. विभागातील चार जिल्ह्यांतील 624 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 63 परिरक्षक केंद्र निर्धारित केले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गत वर्षाच्या तुलनेत 5 ते 10 टक्क्यांनी वाढली आहे. 86 हजार 567 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे, येथे 1 लाख 15 हजार 5 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

पाच समुपदेशकांची नियुक्ती
इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी-मार्च महिन्यात वेगवेगळ्या तारखांना आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी तणाव न घेता आणि दडपणाखाली न येता परीक्षेला समोरे जावे यासाठी शिक्षण मंडळाने पाच समुपदेशकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये संभाजीनगर – शशिमोहन शिरसाट (मो.९४२२७१५५४६), बीड -एस. पी. मुटकुळे (मो-९६८९६४०५००), जालना – एस. टी. पवार (मो-९४०५९१३८००), परभणी – पी. एम. सोनवणे (मो-९४२२१७८१०१) आणि हिंगोली जिल्ह्यासाठी एस. जी. खिल्लारे (मो-९०११५९४९४४) यांचा समावेश आहे. परीक्षेच्या कालावधीत तणाव आणि दडपण आले तर त्या-त्या जिल्ह्यांतील समुपदेशकांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या विभागीय सचिवांनी केले आहे. नियुक्त केलेल्या समुपदेशकांत सर्व पुरुष समुपदेशक आहेत, विद्यार्थिनींच्या समस्या निराकारण करण्यासाठी महिला समुपदेशकाची नियुक्त करण्यात आली नसल्याने विद्यार्थिंनी आपली शंका व्यक्त करताना संकोच बाळगू शकतात, अशी चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या