संभाजीनगर शहरात स्कॉर्पिओतून ड्रग्जची तस्करी, मुंबईतील दोघांना अटक

शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने आज सकाळी पंचवटी चौकात सापळा रचून अटक केली. वाहनांवर एका नगरसेविकेचा लोगो असल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्कार्पिओ वाहनासह त्यांच्या ताब्यातून 13 ग्रॅम ड्रग्ज आणि 28 ग्रॅम चरस जप्त केले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात ड्रग्ज आणि चरस विक्री करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे आज उघडकीस आले. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या दालनातील सहायक निरीक्षक राहुल रोडे, वेदांतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, सिटी चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सय्यद मोहसिन, उपनिरीक्षक राहुल भदरगे तसेच फॉरेन्सिक विभाग, अन्न व औषधी नियंत्रण विभागाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पथकासह सापळा रचून सकाळी अकराच्या सुमारास पंचवटी चौकात भरधाव वेगाने कन्नडच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओला (एमएच 20, एआर 0002) अडवले. या वाहनावर मनपा नगरसेविकेचा लोगो आहे. या नगरसेविकेचा पती कोण याची चर्चा आयुक्तालयात सुरू होती.

ड्रग्जचे राजकीय कनेक्शन उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वाहनातील कुर्ला येथील आशिक अली मुसा कुरैशी (41) आणि बांद्रा भारतनगरातील नुरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद (40) या दोघांना ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात 28 ग्रॅम चरस आणि दहा मेफ्रोड्रेन 13 ग्रॅम ड्रग्ज असे अमली पदार्थ सापडले. दोघांची चौकशी केली असता त्यांनी अमली पदार्थ हे मुंबई येथून खरेदी केल्यावर त्याची कन्नड येथे विक्री करण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पकडलेल्या या अमली पदार्थांमध्ये मेफ्रोड्रेन एम डी ड्रग्जची किंमत मुंबईत चार हजार रुपये प्रतिग्रॅम, तर संभाजीनगरात त्याची दुप्पट भावाने विक्री होते.

पॉलिटिकल कनेक्शन शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
शहरात नशेच्या गोळ्या विक्रीची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. शहरात ड्रग्ज आणि चरसचाही गोरखधंदा जोमाने सुरू आहे. ड्रग्जचे राजकीय कनेक्शन समोर आल्याने ते उघड करण्यासाठी पोलिसांसमोर नवे आव्हान आहे. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाल्यास मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

img-20200929-wa0024

महाविद्यालय आणि मोठ्या हॉटेल परिसरात अड्डे…
शहरात नशेडींचे प्रमाण वाढत असून, त्यातून अनेक वेळा गँगवार उफाळून आलेले आहे. ड्रग्ज आणि चरसची देखील शहरात मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मोठमोठे हॉटेल आणि महाविद्यालयाच्या पार्किंगच्या आवारात ही मंडळी सर्रास अमली पदार्थ विक्री करतात. कोड वापरून ठराविक ग्राहकांनाच ड्रग्ज विक्री होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या अड्ड्यांकडे पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या