
सामना प्रतिनिधी, औसा
तालुक्यातील भादा गावाला लागून असलेला बोरगाव रोडवरील भादा स्मशानभूमी जवळील पूल गेल्या पाच वर्षापासून पावसाळ्यात चार ते पाच दिवस पाणी पुलावरून येताच वाहून जातो आणि पुढील आठ ते दहा गावाचा संपर्क सतत तुटतो आहे. प्रशासनाची या काळात तारांबळ उडते. आता वेळ आहे पण हे काम करण्याचे कोणाच्या लक्षात येत नाही. तसेच ग्रामीण भागात रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गावोगावी जाणाNया रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता उखडल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहनांचे नुकसान व लहान-मोठे अपघात सतत होत असल्याने शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहेत.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येत आहेत. परंतु औसा तालुक्यातील रस्त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा होत नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्याचे तीनतेरा झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून खड्डे पडल्याने व दगडी गिट्टी उघडी पडल्याने ते वाहन चालक चुकविण्याच्या नादात अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्या तर नामशेष झाल्या आहेत. नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. 361कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाडी तांड्यासह ग्रामीण भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ या खराब रस्त्यामुळे आली आहे.
यावर्षीचे तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र लक्षात घेता ऊस वाहतूक, शेतीमालाची वाहतूक व प्रवाशी वाहतुकीसाठी खड्डेमय रस्त्याची आडकाठी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातून शहरात ही मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशी बसेस, टमटम, जीप, कार, मोटार सायकल तसेच मालाची वाहतूक करणारे ट्रक, टॅम्पो, ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या चालकांना रस्त्यावरुन प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाढते अपघात लक्षात घेता ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा तत्काळ करणे व आवश्यक तेथील रस्त्यावरचे तात्पुरते खड्डे बुजविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या भादा-आंदोरा, बोरगाव-भेटा या रस्त्याची कामे सुरू आहेत. परंतु रस्त्यावर दगडी गिट्टी उघडी असल्याने वाहने पंक्चर व टायर फुटणे, तडे जाणे असे प्रकार होत आहेत. यासाठी या रस्त्याचे लवकर डांबरीकरण होणे आवश्यक आहे.
बोरगाव शिव ते भेटा शिव या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून अनेकांनी या कामाबाबत बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याकडे तक्रारी केल्या. पण त्यावर कांहीच कार्यवाही झालेली नाही उलट तक्रार देणाNया नागरीकांना काम चांगले होत असल्याचा बहाना करून गोड बोलून पाठवून देतात. याबाबत लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक भिसे यांनी होत असलेल्या खराब रस्त्याबाबत संबंधीत अधिकाNयांची कानउघडणीही केली असल्याची चर्चा आहे. परंतु यावर काम करणारे अभियंता यांनी हे काम मंजूर तांत्रिक बाबीची पूर्तता होऊन हे काम होत आहे का? हे पाहणे आवश्यक आहे. तसेच भादा-शिवली, भादा-शिंदेवाडी, भादा-उटी आदी रस्ते अत्यंत खराब झाले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांनी लक्ष देणे गरजेचे असून लोकांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तालुक्यातील सर्वच रस्त्याची दुरावस्था थांबविण्याची आवश्यकता नागरिक व्यक्त करीत आहेत.




























































