
तब्बल पाच वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱया मिचेल मार्शच्या झंझावाती शतकाने ऑस्ट्रेलियाच्या डावाला 4 बाद 240 अशी बळकटी दिली होती, पण पुनरागमन करणाऱया मार्क वूड आणि ख्रिस व्होक्सच्या भन्नाट मार्यापुढे त्यांचे 6 फलंदाज अवघ्या 23 धावांत गडगडल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा तिसऱया ‘ऍशेस’ कसोटीतला पहिला डाव 263 धावांवर कोसळला. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लडची 3 बाद 68 अशी स्थिती होती. ते 195 धावांनी पिछाडीवर आहेत.
‘ऍशेस’ राखण्याच्या उंबरठय़ावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने सौम्य दुखापत झालेल्या कॅमरून ग्रीनला विश्रांती देताना तब्बल पाच वर्षांनंतर मिचेल मार्शला संघात स्थान दिले आणि पुनरागमन करणाऱया मार्शने मिळालेल्या संधीचे सोने केले. इंग्लंडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला बोलावले. स्टुअर्ट ब्रॉडने कसोटीच्या पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला टिपत सनसनाटी सुरुवात केली. मग उस्मान ख्वाजा (13), मार्नस लाबुशेन (21) आणि स्टीव्हन स्मिथ (22) यांना उपाहारापूर्वीच बाद करत इंग्लंडने पहिल्या सत्रात पाहुण्यांची 4 बाद 91 अशी बिकट अवस्था केली. मात्र त्यानंतर मिचेल मार्शचा घणाघात हेडिंग्लेवर पाहायला मिळाला. मार्शने ट्रव्हिस हेडबरोबर दुसरे सत्र गाजवले. मार्शने दुसर्या सत्रात 16 चौकार आणि 4 षटकारांची बरसात करत 113 धावा चोपून काढल्या. विशेष म्हणजे 26 षटकांच्या या सत्रात 149 धावा वसूल केल्या, पण सत्राचे शेवटचे षटक सुरू असताना मार्शला व्होक्सने बाद केले आणि ही जोडी फोडली.
वूड–व्होक्सचा कहर
मार्श बाद झाल्यावर सुस्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव संपायला फार वेळ लागला नाही. वर्षभराने संघात आलेल्या व्होक्सने मार्शपाठोपाठ हेडलाही बाद केले. मग सात महिन्यांनी संघात परतलेल्या मार्क वूडने आपल्या पुढील 14 चेंडूंत 5 धावांत 4 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डावच गुंडाळला. वूडने चौथ्यांदा डावात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. त्याने तीन फलंदाजांचे त्रिफळे उडवले. व्होक्सनेही 74 धावांत महत्त्वाचे 3 फलंदाज बाद केले.


























































