
अॅडलेडचे मैदान एकेकाळी विराट कोहलीच्या शतकांनी उजळलेले असायचे. आज मात्र झम्पाच्या गुगलींनी आणि बार्टलेटच्या बाऊन्सरनी मंदावलं! पुढे मॅथ्यू शॉर्टच्या सर्किट फलंदाजीने हिंदुस्थानला विजयाच्या समीपही पोहचू दिले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिंदुस्थानचा खेळ असा वाटला की ते खेळायला उतरले, खेळले आणि पडले… आणि मग ऑस्ट्रेलियाने किल्ली फिरवून विजयाचा दरवाजा अगदी सहज उघडला आणि विजयच नव्हे तर तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली.
ऑस्ट्रेलियाने अॅडम झम्पा आणि झेव्हियर बार्टलेट या जोडीच्या अचूक माऱ्याच्या जोरावर हिंदुस्थानी फलंदाजांना कसेबसे २६५ पर्यंत पोहचू दिले. मग शॉर्ट (७४) आणि कोनोली (६१ नाबाद) यांनी हे लक्ष्य आईस्क्रीमचा आनंद घेत असल्यासारखे गाठले.
ऑस्ट्रेलियाचा पाठलाग
ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत सामान्य झाली. ट्रॅव्हिस हेड (२८) आणि कर्णधार मिशेल मार्श (११) या दोघांना अर्शदीप आणि राणाने पन्नाशी गाठताच पॅव्हेलियनकडे पाठवले. पुढे मॅथ्यू शॉर्टही बाद झाल्यातच जमा होता. पण हिंदुस्थानी खेळाडू झेल पकडायचेच विसरल्याचा भास होत होता. शॉर्टला दोनदा जीवदान मिळाले. पहिल्यांदा अक्षरने हलवा झेल सोडला आणि दुसऱ्यांदा सिराजने इतका सोपा झेल सोडला की क्रिकेटच्या देवतेलाही वाटलं, ‘अरे, हे खऱ्या सामन्यात चाललंय की नेट्समध्ये?’ जीवदानाचा लाभ घेत शॉर्टने ७८ चेंडूंत ७४ ठोकल्या आणि कोनोलीने ५३ चेंडूंत नाबाद ६१ धावा करत फिरकी असो किंवा वेगवान मारा हे दोन्ही आमच्या ओळखीचे आहे. शेवटी मिचेल ओव्हनने २३ चेंडूंत ३६ धावा चोपत ऑस्ट्रेलियाच्या एकतर्फी विजयावर २२ चेंडू आधीच शिक्कामोर्तब केले.
हिंदुस्थानकडून सुंदर वॉशिंग्टनने थोडा प्रतिकार केला, राणाने दोन विकेट घेतले, पण कोनोलीच्या शांत स्ट्रोक्ससमोर त्याचा काहीएक उपयोग झाला नाही.
हिंदुस्थानचा धक्कादायक प्रारंभ
कधी कधी सामना सुरू होतो आणि आपण पहिल्याच ओव्हरमध्ये विचारतो, हा सामना आहे की ट्रेलर ? बार्टलेटने नेमके तसेच केले. शुभमन गिलने (९) चेंडू हवेत उचलला आणि मार्शच्या हाती गेला. लगेचच विराट कोहली (०) आत येणाऱ्या चेंडूवर पायचीत झाला आणि वन डे कारकीर्दीत प्रथमच सलग दोनदा शून्यावर बाद होण्याची त्याच्यावर वेळ आली. बार्टलेटच्या या षटकाने हिंदुस्थानी संघाच्या आणि चाहत्यांच्या काळजात धस्स केलं.
अक्षर पटेलने (४४) थोडी प्रगल्भफलंदाजी केली म्हणजे धुक्यात सूर्यकिरण. त्यानंतर तळाच्या हर्षित राणा आणि अर्शदीपने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढवत हिंदुस्थानला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. पण या लक्ष्यात जीव ओतण्याची किमया हिंदुस्थानी गोलंदाज दाखवू शकले नाहीत. झम्पाने ४ तर बार्टलेटने ३ विकेट घेत हिंदुस्थानच्या पराभवाचा खड्डा खणला.
रोहितचा फॉर्म परतला
गिल आणि कोहली बाद झाल्यावर रोहित शर्मा (७३) आणि श्रेयस अय्यर (६१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागी रचत हिंदुस्थानी संघाच्या जिवात जीव आणला. भागीदारी चांगली होती, पण त्यात ती ऊर्जा नव्हती. टी-२० च्या खेळात प्रत्येक संघ जिथे दोनशेचा टप्पा गाठतो तिथे या धावा अशोभनीय होत्या. कासवगतीने फलंदाजी सुरू होती. पुढे रोहितचा फॉर्म हळूहळू जागा झाला. त्याने मी अजून असल्याचे दाखवून देत फटके मारले. तो शतकाजवळ पोहोचत असताना स्टार्कच्या चेंडूला उचलण्याचा मोहात बाद झाला. पुढे श्रेयस अय्यरनेही अर्धशतक केले, पण त्यानेही आपली विकेट झम्पाला अर्पण केली. मग राहुल (११) सुद्धा त्याच फिरकी प्रयोगात फसलाच.


























































