लॉर्ड्सवर रबाडाचा राडा, ऑस्ट्रेलियाला 212 धावांत गुंडाळले; द.आफ्रिका 4 बाद 43

जागतिक कसोटी अजिंक्यपद राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव पहिल्या दोन सत्रातच 212 धावांवर आटोपला. कॅगिसो रबाडाने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर लॉर्ड्सवर अक्षरशः राडा घातला. त्याने 51 धावांत ऑस्ट्रेलियाच्या निम्मा संघाला गारद करत पहिल्या दिवसावर दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व दाखवले. मात्र तिसऱया सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही आपली कमाल दाखवत दक्षिण आफ्रिकेच्या 4 फलंदाजांना 43 धावांतच तंबूचा मार्ग दाखवला. परिणामतः अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी 255 धावांत 14 विकेट पडल्या.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 212 धावांत संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका फलंदाजीला आली आणि मिचेल स्टार्कने डावाच्या पहिल्याच षटकात एडन मार्करमला शून्यावर बोल्ड केले. सलामीवीर रायन रिकल्टनची (19) विकेटही स्टार्कनेच काढली. मग कमिन्सने वियान मुल्डरची (6) तर हेझलवूडने ट्रिस्टन स्टब्जची (2) विकेट उडवत त्यांची 4 बाद 30 अशी दुर्दशा केली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बवुमा (3) आणि डेव्हिड बेडिंगहम (8) हे दोघे खेळत होते.

रबाडाची सनसनाटी सुरुवात

टेम्बा बवुमाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला बोलावण्याचा घेतलेला निर्णय फायदेशीर ठरला. सलामीवीर उस्मान ख्वाजाने आज अर्धा तास मैदानावर फलंदाजी केली, पण त्याला आपल्या धावांचे खातेही उघडता आले नाही. रबाडाने त्याचा काटा काढत दक्षिण आफ्रिकेला स्वप्नवत सुरुवात करून दिली. मग कॅमरून ग्रीनने खणखणीत चौकार ठोकत रबाडाचे स्वागत केले, पण त्याच षटकात रबाडाने ग्रीनच्या खेळीला रेड सिग्नल दाखवत तंबूत धाडले. 4 चेंडूंत 2 विकेट गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाची 2 बाद 16 अशी अवस्था झाली. त्यानंतर प्रथमच सलामीला उतरलेल्या मार्नस लाबुशनने स्टीव्ह स्मिथच्या साथीने संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण माकां यान्सनने त्याची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेला तिसरे यश मिळवून दिले. पुढे यान्सननेच ट्रव्हिस हेडची विकेट काढत उपाहारापूर्वीच जगज्जेत्यांची 4 बाद 67 अशी अवस्था केली.

गेल्या दोन डावांत 141 आणि 131 धावांच्या खणखणीत शतकी खेळी करणारा स्मिथ 66 धावांवर बाद झाला. त्याला वेबस्टरने सुरेख साथ दिली. स्मिथ बाद झाल्यामुळे ऑस्टेलियाची 5 बाद 146 अशी धावसंख्या झाली. त्यानंतर वेबस्टर आणि अॅलेक्स कॅरीने पुढील 8 षटकांत 44 धावा काढल्या. चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा 5 बाद 190 अशा स्थितीत होती. मात्र चहापानानंतर रबाडाने ऑस्ट्रेलियन डावात गोंधळ घातला आणि अवघ्या 20 धावांत त्यांचा अर्धा संघ रबाडा आणि कंपने बाद केला.