
ऍडलेड येथील डे-नाईट कसोटीआधी यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. अनुभवी डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱया पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियन संघासमोर सलामीला कोणता फलंदाज येईल, हा यक्षप्रश्न उभा ठाकणार आहे. विल पुकोवस्की व जो बर्न्स यांच्या खांद्यावर सलामी फलंदाजीची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
डेव्हिड वॉर्नर याप्रसंगी म्हणाला, दुखापतीमधून बरा होत आहे. पण कसोटी क्रिकेटसाठी मैदानात उतरण्यासाठी मी मानसिकदृष्टय़ा अद्याप तयार नाहीए. फिटनेस कमवण्यासाठी आणखी दहा दिवस तरी जातील. रनिंग बिटविन द विकेटस् व चपळता यांसारख्या बाबी मनाजोगत्या व्हायला हव्यात, असेही तो पुढे म्हणाला. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यावेळी म्हणाले, डेव्हिड वॉर्नरने प्रचंड मेहनत करून इथपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर मेलबर्न येथील दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाला नक्कीच फायदा होईल.
कोण येणार सलामीला
डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत जो बर्न्स व विल पुकोवस्की यांना सलामीला फलंदाजीला यावे लागण्याची शक्यता आहे. मात्र सराव लढतीत कार्तिक त्यागीचा चेंडू लागल्यानंतर विल पुकोवस्कीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच जो बर्न्स सुमार फॉर्ममधून जात आहे. त्याला पहिल्या सराव सामन्यात 4 व 0 धावाच करता आल्या आहेत. तसेच या मोसमात लाल चेंडूने खेळल्या जाणाऱया क्रिकेट प्रकारात त्याला 8.71 च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या दोघांशिवाय आणखी कोणत्या खेळाडूची या जागेसाठी निवड करतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
ग्रीन, स्वेपसन ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात
ऍडलेड कसोटीआधी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ आणखी एक सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या सराव सामन्यासाठी कॅमरून ग्रीन व मिचेल स्वेपसन या दोन खेळाडूंची ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे. या दोघांसह या संघात जो बर्न्स, मार्कस हॅरीस, मोयसेस हेन्रीक्स, निक मेडीनसन, ऍलेक्स कॅरी, सीन ऍबट, विल सदरलॅण्ड, बेन मॅकडरमॉट, हॅरी कॉनवे, मार्क स्टीकेटी या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.


























































