The Ashes – बॅझबॉलचा वाजला बँडबाजा; सिडनी कसोटी जिंकत ऍशेसवर ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने कब्जा

ऍशेस मालिकेतील अखेरच्या लढतीत ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा 5 विकेट्सने पराभव करत ही मालिका 4-1 अशी जिंकली. इंग्लंडच्या बॅझबॉलवर ऑस्ट्रेलिया वरचढ ठरली आणि विजयासाठी मिळालेले 160 धावांचे आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. पहिल्या डावात दीड शतकी खेळी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर, तर मालिकेत सर्वाधिक 31 विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्कला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मालिकेत 3-1 ने पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने सिडनी कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. यंदाच्या वर्षाची सुरुवात विजयाने व्हावी या आशेने इंग्लंडचा संघ मैदानात उतरला. पहिले तीन खेळाडू झटपट बाद झाल्यानंतर जो रूटने 242 चेंडूत 160 धावा आणि हॅरी ब्रुकने 97 चेंडूत 84 धावा करत डाव सावरला. त्यानंतर जेमी स्मिथने 46 धावा चोपत संघाला 375 धावांचा टप्पा ओलांडून दिला. पहिल्या डावात इंग्लंडने 384 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियानेही इंग्लंडचा खणखणीत प्रत्युत्तर दिले. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात शतकी खेळी केली. हेडने 163, तर स्मिथने 138 धावा चोपल्या. या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 567 धावा करत 183 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. ही आघाडी निर्णायक ठरली. इंग्लंडचा दुसरा डाव 342 धावांवर आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 160 धावांचे आव्हान मिळाले.

विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. अवघ्या 31.2 षटकांमध्ये पाच विकेट्सच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलिया हे आव्हान पार केले.