फेसबुकविरोधात ऑस्ट्रेलियात खटला; तब्बल 3 लाखांहून अधिक युजर्सचा डाटा लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियात लोकप्रियतेत बाजी मारलेल्या फेसबुकविरोधात ऑस्ट्रेलियात खटला दाखल करण्यात आला आहे. तब्बल तीन लाखांहून अधिक फेसबुक युजर्सचा पर्सनल डाटा लीक केला गेल्याचा आरोप आहे. संबंधित पर्सनल डाटाचा राजकीय प्रोफायलिंगसाठी गैरवापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याप्रकरणी ‘फेसबुक आयएनसी’विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वैयक्तिक गोपनीयता नियामकांकडून फेडरल कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. फेसबुककडून ‘धीस इज युकर डिजिटल लाइफ’ नामक ऍपला युजर्सची माहिती देऊन वारंवार खासगी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचा आरोप आहे. ऑस्ट्रेलियातील 3,11,127 फेसबुक युजर्सचा पर्सनल डाटा ‘केंब्रिज ऍनालिटिका’ या सल्लागार संस्थेला हस्तांतरित केला जाण्याची भीती आयुक्तांनी सोमवारी एका निवेदनाद्वारे व्यक्त केली.

  • फेसबुकने केंब्रिज ऍनालिटिकाला पर्सनल डाटा विकल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी समोर आले होते. ते प्रकरण फेसबुकने अमेरिकेच्या केंद्रीय व्यापार आयोगासोबत पाच अब्ज डॉलरचा करार करून मिटवले होते. त्यानंतर आता पुन्हा खटला दाखल झाल्याने फेसबुकच्या अडचणीत भर पडली आहे.