
इराण आणि अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे राहिले असून, याचे थेट पडसाद आता ऑस्ट्रेलियात उमटू लागले आहेत. या गंभीर परिस्थितीचा विचार करून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी आपले नियोजित सर्व देशांतर्गत दौरे तातडीने रद्द केले आहेत. मध्य पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने ऑस्ट्रेलियाला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे.
पंतप्रधान अल्बनीज यांनी देशाला संबोधित करताना सद्यस्थितीची माहिती दिली आणि नागरिकांना इंधनाचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले. इंधनाचा साठा मर्यादित असल्याने जनतेने खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. वाढत्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून ही सवलत पुढील तीन महिन्यांसाठी लागू राहणार आहे.
शेतकरी, मालवाहतूकदार आणि अत्यावश्यक सेवांसाठी डिझेलचा पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सरकार सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ११६ डॉलरच्या पार गेल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. विमान इंधनाचा तुटवडा भरून काढण्यासाठी इतर देशांकडून मदत घेतली जात असून, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सरकारने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.



























































