
<<< अनिल हर्डीकर
फिल्मिस्तानचे मालक शशिधर मुखर्जी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी म्हणून एस. एच. बिहारी यांची धडपड चालली होती. बराच काळ थांबूनही मुखर्जींची भेट मिळत नाही हे पाहता बिहारी यांनी काही ओळी त्यांना लिहून पाठवल्या आणि त्यांची प्रतीक्षा संपली.
आज मी ज्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मोठ्या दोघांची पहिली भेट कशी झाली ते सांगणार आहे, तेव्हा मला आणखी एका गमतीशीर भेटीचा किस्सा सांगण्याचा मोह होतोय. काही वर्षांपूर्वी बजाजच्या उत्पादनांची जाहिरात खूप लोकप्रिय झाली होती. त्यातले शब्द होते, ‘ये जमीं, ये आसमाँ, हमारा कल, हमारा आज, बुलंद भारत की बुलंद तस्वीर… हमारा बजाज!’
त्यानंतर काही दिवसांनी कुणीएक गृहस्थ बजाज साहेबांकडे काही कामानिमित्त मुलाखतीसाठी वेळ द्या, म्हणून विनवत होते. पण त्यांना भेटीसाठी वेळ मिळत नव्हती. शेवटी ते गृहस्थ बजाज साहेबांच्या ऑफिसात गेले. तिथे बराच वेळ त्यांना थांबावं लागलं. बजाज साहेबांच्या सेक्रेटरीने त्या गृहस्थांना त्यांचं काम काय आहे ते चिठ्ठीवर लिहून द्यायला सांगितलं. त्या गृहस्थांनी आपलं काम लिहून आजवर किती आणि कसा भेटण्याचा प्रयत्न केला ते लिहून शेवटी लिहिलं…“आजही मी तुमची भेट न होता गेलो तर मी यापुढे कधीही ‘हमारा बजाज’ म्हणणार नाही.’’ ती चिठ्ठी बजाजसाहेबांच्या हाती पडली आणि त्यांनी दुसऱया क्षणाला त्या गृहस्थाला भेटीसाठी आपल्या केबिनमध्ये बोलावलं.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत शकील बदायुनी, हसरत जयपुरी, साहिर लुधियानवी, राजेंद्र कृष्ण अशा गीतकारांना जो लौकिक मिळाला तो एस. एच. बिहारी या गीतकाराला कधीही मिळाला नाही. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत एस. एच. बिहारी हे चित्रपटांसाठी अत्यंत सोप्या भाषेतील गाणी लिहिण्यासाठी फार प्रसिद्ध होते. त्यांच्या प्रतिभावान आणि भावपूर्ण आणि तितक्याच सोप्या आणि अंतकरणाला भिडणाऱ्या गाण्यांनी एकेकाळी रसिकांना वेड लावलं होतं, पण आपण जी गाणी गुणगुणतो आहोत ती एस. एच. बिहारी यांची आहेत हे रसिकांना कळलं नाही. चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून प्रसिद्धी मिळण्यापूर्वी बिहारींना किती तपश्चर्या करावी लागली त्याची कल्पनाच केलेली बरी.
झारखंडमधील अगदी छोट्या आरा नावाच्या गावातून आलेला शमसुल हुदा बिहारी हा तरुण कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून पदवीधर असलेला आणि मोहन बगान क्लबच्या टीममधून फूटबॉल खेळणारा होता. कोलकात्यात राहिल्यामुळे बांगला भाषादेखील तो उर्दू आणि हिंदीइतकाच जाणणारा होता. भरपूर वाचन आणि लिहिण्याची आवड असणारा हा तरुण गीतकार होण्याचं स्वप्न पाहत होता. गीतकार होण्यासाठी मुंबईला आला. शशिधर मुखर्जी हे फिल्मिस्तानचे मालक, अनेक चित्रपटांचे यशस्वी निर्माते. साहजिक अशा माणसाबरोबर काम करण्याची संधी मिळावी म्हणून एस. एच. बिहारी यांची धडपड चालली होती, पण काही केल्या शशिधर मुखर्जी यांची भेट होण्याचं काही चिन्ह दिसेना. दोन-दोन तास थांबूनदेखील मुखर्जींची भेट मिळत नसे. मात्र ती प्रतीक्षा एका संध्याकाळी संपली. शशिधर मुखर्जी त्यांच्या ऑफिसात एकटेच बसलेले असताना एका कागदाच्या चिठ्ठीवर खालीलप्रमाणे चार ओळी खरडल्या आणि शिपायाकरवी त्या आत पाठवल्या. त्या ओळी होत्या…
मेरे तकदीर के मालिक
मेरा कुछ फैसला कर दो
भला चाहे भला कर दे
बुरा चाहे बुरा कर दे
बिहारींच्या नशिबाने ती चिठ्ठी मुखर्जी साहेबांनी वाचली आणि एस. एच. बिहारी यांना आत बोलावलं. त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्यावर मुखर्जी एकदम रंगात आले. त्यांनी बिहारींना ते गाणं पूर्ण लिहिण्याचं फर्मान सोडलं आणि ते गीत चित्रपटात घेण्याचं वचन दिलं. हेच गाणं पुढे फिल्मीस्तानच्या ‘शर्त’ या चित्रपटात आलं आणि गाजलंदेखील.
त्या काळी मुशायरे गाजवणारे शकील बदायुनी, साहिर लुधियानवी, कैफी आामी हे डाव्या विचारसरणीचे, परमेश्वरावर विश्वास नसणारे शायर होते. मात्र एस. एच. बिहारी हा गीतकार परमेश्वरावर विश्वास असणारा आणि रोमॅण्टिक होता. ‘गजल’ या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांच्या तोंडी एक संवाद होता… “ये मेरा यकीन ही नहीं, बल्की मेरा इमान है की, जो शख्स अल्लाह को नहीं मानता वो अच्छी गजल लिख नहीं सकता.’’
दोन मुलं अकाली मृत्यू पावणे, तशाच प्रापंचिक अनेक अडचणी असताना हा शायर ‘इशारों इशारों मे जादू चलाना मेरी जाँ तूने ये सीखा कहां से?’, ‘तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हे बनाया’, ‘ना ये चाँद होगा ना तारे रहेंगे मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे’, ‘कजरा मोहब्बतवाला’, ‘जरा होल्ले होल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे’, ‘बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी मेरी जिंदगीमे हजूर आप आये’, ‘देखो वो चाँद छुपके करता है क्या इशारे’सारखी शब्दमधुर गाणी लिहितो. आज एस. एच. बिहारी आपल्यात नाहीत, पण त्यांची गाणी ज्या-ज्या वेळी कानांवर किंवा ओठांवर येतात त्या वेळी सहजच मनात येतं, ‘तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हे बनाया!’