
<<< अस्मिता येंडे
लेखक रामदास खरे यांची ‘द लॉस्ट बॅलन्स’ ही पहिलीच कादंबरी असून अर्थकारणासोबतच उद्ध्वस्त झालेल्या, दुभंगलेल्या जाणिवांचा विस्तृत पट मांडणारी आहे. या कादंबरीचे कथानक नियमित विषयांपेक्षा वेगळे आहे. या कादंबरीच्या शीर्षकापासूनच लेखकाने वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे. ‘द लॉस्ट बॅलन्स’ या शीर्षकातून दुहेरी परिमाण लेखकाने अधोरेखित केला आहे. जीवनात शारीरिक तसेच मानसिक समतोल राखणे महत्त्वाचे आहे. काही ठरावीक मनोवृत्तीच्या स्वार्थीपणामुळे हकनाक सर्वाना वेठीस धरले जाते, तेव्हा जो उद्विग्नतेचा स्फोट होतो, त्याची दाहकता शब्दातून लेखकाने पोहोचवली आहे.
या कादंबरीत दर्शवलेल्या रत्नावली बँकेवर आरबीआयने आर्थिक निर्बंध लादल्याने बँक व्यवस्थापक, बँकेतील कर्मचारी, अधिकारी तसेच प्रामाणिक खातेदार यांच्यावर एक प्रकारे आभाळच कोसळते. आर्थिक निर्बंधांमुळे कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करता येणार नाही, या आदेशामुळे वरपासून ते खालील स्तरावरील माणसांवर त्याचा कसा परिणाम होतो, याची विस्तृत मांडणी लेखकाने केली आहे.
लेखकाला बँकिंग क्षेत्राचा सखोल अनुभव असल्याने या क्षेत्रातील संबंधित संज्ञा, संकल्पना, नियमावली, कामाचे स्वरूप याचा सुयोग्य वापर कादंबरीत केलेला आहे. या कादंबरीतील घटना- प्रसंग, कालावकाश, भाषाशैली, निवेदन शैली, पात्रांचे संवाद या घटकांमुळे कादंबरीची रचना वा आलेख मनात एक प्रकारे हुरहुर निर्माण करतो. पात्रांच्या पार्श्वभूमीनुसार संवादाची तीव्रता कधी संयमित तर कधी तीव्र होत जाते. यावरून लक्षात येते, की प्रत्येक पात्राच्या पार्श्वभूमीचा, वैचारिक भूमिकेचा लेखकाने बारकाईने अभ्यास केला आहे.
ज्या प्रामाणिक भावनेने एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेचे बीज रोवते, त्याच्या मुळावर घाव घालून काही स्वार्थी व्यक्ती आपले हित जोपासण्यासाठी त्या भावनेला सुरुंग लावतात. तेव्हा जे नुकसान होते ते कधीच भरून निघण्यासारखे नसते. रत्नावली बँकेच्या संचालक मंडळावरील काही संचालकांच्या अप्पलपोटी स्वभावामुळे कोणतीही कागदपत्रे नियमानुसार न पाहता ज्या लोकांना सढळ हाताने कर्ज वाटप केले गेले, त्या कर्जदारांच्या मनमानी स्वभावामुळे किंवा संचालकांवर वेळोवेळी केलेल्या उपकारांमुळे कर्जाची परतफेड केली गेली नाही. नियमानुसार कर्ज वाटपाची कार्यवाही न केल्यामुळे वसुली समाधानकारक झालेली नाही, एन. पी. ए.चा वाढता स्तर यामुळे बँकेच्या नैतिक तत्त्वांवर प्रश्न निर्माण केले जातात.
ही कादंबरी एकूण 20 प्रकरणांच्या माध्यमातून कार्यालयीन, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक असे विविध स्तर समोर आणते. आर्थिक निर्बंधांमुळे आपले पैसे बँकेत अडकू नयेत म्हणून पैसे काढण्यासाठी रोज बँकेत येणारा खातेदारांचा लोंढा, खातेदारांच्या रोषाला सामोरे जाणारा स्टाफ, बँक व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी, प्रशासक यांच्यावरील कामाचा ताण आणि वसुलीचे आव्हान, हे सगळे प्रसंग वाचताना प्रत्येक पात्राची बाजू लक्षात येते.
या कादंबरीत अनेकांगी पात्रे आपल्याला भेटतात. त्या बँकेशी निगडित असलेली, कर्मचारी, सर्वसामान्य खातेदार, राजकीय व्यक्ती इत्यादी. या कादंबरीत कामाच्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा परिणाम कर्मचाऱयांच्या, अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनावरही होतो, याचीही दखल लेखकाने विचारपूर्वक घेतली आहे. काही वरच्या स्तरावरील लोकांच्या वरदहस्तामुळे, संस्थेचे संचालक कसा मिंधेपणा स्वीकारुन बँक डबघाईला आणतात, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय.
काही अप्रामाणिक लोकांना, स्वतचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांना प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती नेहमीच डोळ्यात खुपत असते. काही ओळखी वापरून अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांना कसे अलगद बाजूला केले जाते, हे प्रशासकाच्या अचानक झालेल्या बदलीच्या प्रसंगातून लक्षात येते. आर्थिक नफा कमावण्यासाठी सामान्य लोकांच्या आयुष्यभराच्या जमापुंजीवर डल्ला मारणारे संचालक, बँक वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे कर्मचारी-अधिकारी, संचालकांच्या पाठिंब्यामुळे निर्ढावलेले कर्जदार आणि आपले पैसे परत मिळावेत म्हणून खेटे मारणारे ठेवीदार, यांच्यातील द्वंद्व आणि समतोल वास्तव या कादंबरीत चित्रित केले आहे.
तसे पाहायला गेले तर या कादंबरीत दोन बँकांच्या आर्थिक स्थित्यंतराची गोष्ट आहे. ज्या सद्हेतूने ह्या दोन्ही बँका निर्माण केल्या गेल्या, त्यांच्या जुन्या संचालकांच्या तत्त्वांची पायमल्ली करून नव्याने रुजू झालेल्या संचालकांच्या चुकीच्या धोरणांमुळे किंवा अनावश्यक हस्तक्षेपामुळे संस्थेचा पाया मुळापासून कसा उद्ध्वस्त होतो, त्याची कहाणी जितक्या तत्त्वनिष्ठतेने मांडली आहे, तितक्याच संवेदनशील भावनेने आपल्यासमोर लेखकाने प्रस्तुत केली आहे. बँकेतील खात्यात काय किंवा जीवनातील चढ-उतारात काय, उत्तम समतोल राखणे किती गरजेचे आहे, ही बाब पटवून देणारी संतुलित कादंबरी आहे.
मराठी साहित्यात फारसा न रुळलेला अर्थकारण हा लेखनप्रकार या कांदबरीच्या माध्यमातून आपण जाणू शकतो. लेखकाने अगदी परिश्रमपूर्वक बँकिंग क्षेत्रातील बाबी उलगडल्या आहेत.
पैसा हे केवळ व्यवहाराचे माध्यम नसून आपलं जगणंच त्याच्याभोवती फिरत असतं. आयुष्यातील महत्त्वाचा घटक ज्याच्यावर आपली भिस्त अवलंबून असते. या विषयाभोवती फिरणारी ही कांदबरी त्यामुळे रोचक ठरली आहे. समकालीन वास्तवाचा पट यातून लेखकाने साकारला आहे. काहीशा स्वार्थासाठी सारासार विचार हरवून बसणारी सामान्य माणसं, आयुष्यभराची पुंजी बँकांच्या हवाली करणारे वयस्कर नागरिक, ठेवीदार, राजकारणी, बँकांचे संचालक यांच्या चित्रणातून साकारलेली ही कादंबरी. बँकिंगसारख्या काहीशा रुक्ष वाटणाऱया क्षेत्राचे हे समकालीन वास्तव मांडताना लेखकाने प्रत्यक्ष जीवनातील दिलेली उदाहरणं एका समांतर कथाप्रमाणे भासतात. कादंबरी अनघा प्रकाशनाने प्रकाशित केली असून या कादंबरीचे मुखपृष्ठ स्वत लेखकाने रेखाटले आहे. तसेच डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी यांनी कादंबरीची यथोचित पाठराखण केली आहे.
द लॉस्ट बॅलन्स – कादंबरी
लेखक : रामदास खरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन
मूल्य : 500 रुपये ह पृष्ठे : 272