
<<< दिलीप ठाकूर >>>
चित्रपटात एकदा का दुय्यम भूमिका साकारली की चित्रपटसृष्टी त्यावरच जणू शिक्का मारते आणि त्या कलाकाराच्या वाटेला त्याच पठडीतील भूमिका मिळतात आणि मग ती चौकट मोडून काढणं अवघड होत जाते. मधु मल्होत्राच्या बाबतीत तेच झाले आणि सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील मसालेदार मनोरंजक चित्रपटात चार सहा दृश्यं असलेल्या अथवा एखाद्या गाण्यापुरत्या भूमिका साकारत वाटचाल करावी लागली. येथपर्यंत तरी ठीक आहे, पण काही चित्रपटांत तिच्यासोबत खलनायकाची झटापट अथवा खलनायकाने तिच्यावर केलेली जबरदस्ती अशी आणि एवढीच भूमिका आली. सुभाष घई दिग्दर्शित ‘विश्वनाथ’ या चित्रपटात तेच तिच्या वाटेला आले. एका रात्री एका भल्या मोठ्या बंगल्यात दोन कपटी आणि क्रूर खलनायक (रणजित आणि सुधीर) शिरतात आणि ते ज्या युवतीवर अन्याय करतात ती युवती म्हणजे मधु मल्होत्रा. हे दृश्य रणजितच्या ‘वन्स इन अ ब्ल्यू ः कभी कभी ऐसा भी होता है’ या विशिष्ट शैलीत म्हटलेल्या संवादाने गाजलं, तसेच ते मधु मल्होत्राच्या अतिशय घाबरलेल्या अशा मुद्राभिनयानेही गाजलं. पण काही वेळा दिग्दर्शक तिचा अशाच दुर्दैवी भूमिकेसाठी विचार करू लागले हे दुर्दैव.
मधु मल्होत्राला सुभाष घई दिग्दर्शित हीरो, यश चोप्रा दिग्दर्शित काला पत्थर, राज एन. सिप्पी दिग्दर्शित सत्ते पे सत्ता, कयामत, विक्रम भट्ट दिग्दर्शित गुलाम अशा मोठ्या निर्माता आणि दिग्दर्शकांच्या चित्रपटातून लहान मोठ्या भूमिका मिळाल्या, पण त्याचा कारकिर्दीला आकार देण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही. कारण अशा अर्थहीन अथवा दिखाऊ भूमिका साकारण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक छोटे कलाकार वावरत असतात. त्यामुळे हाती आलेली छोटी भूमिकाही नाकारता येत नाही. सुभाष घई दिग्दर्शित ‘हीरो’ (1983) या चित्रपटात ‘लंबी जुदाई’ हे लोकप्रिय गाणे रुपेरी पडद्यावर साकारायला मिळाले ही मधु मल्होत्राची सर्वाधिक लक्षवेधक भूमिका. आणि राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘सत्ते पे सत्ता’ (1983) या चित्रपटात हेमा मालिनी, रंजिता, सारिका यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हेदेखील महत्त्वाचे.
मधु मल्होत्राला भूतपटाचे हुकमी निर्माते आणि दिग्दर्शक मोहन भाकरी यांच्या ‘चीख’ (1985) या भयपटात नायिका साकारण्याच्या मिळालेल्या संधीचा तिने सदुपयोग केला. अशा चित्रपटात सतत भयग्रस्त चेहरा ठेवत तणावात वावरावे लागते. पण अशा भयपटाना आणि त्यातील कारागीरीला फारसं कोणी गंभीरपणे घेत नाही. त्यामुळे हा चित्रपट गल्ला पेटीवर यशस्वी ठरूनही मधु मल्होत्राला त्याचा फारसा उपयोग झाला नाही. उलट याच पठडीतील ‘रुहानी ताकद’ अशा भुतांच्या गोष्टी असलेल्या चित्रपटात भूमिका साकारत आपलं अस्तित्व टिकवावे लागले. ‘खरा खोटा’ या धाडसी कथानकावरील चित्रपटात मधु मल्होत्राला आधुनिक फॅशनेबल कपड्यात वावरावे लागले, अगदी पोस्टरवरही स्थान मिळाले. पण तरीही कारकीर्द गती घेऊ शकली नाही. ‘वो बेवफा’ वगैरे वगैरे अनेक चित्रपटांतून ती लहान मोठ्या भूमिकेत होती. पण चित्रपटसृष्टी कोणासाठी थांबत नाही. काळ पुढे सरकला, पुढील पिढीत अशाच लहान मोठ्या भूमिका साकारण्यासाठी नवतारका आल्या. मधु मल्होत्रा पडद्यावर दिसेनाशी झाली हेही फारसं कोणी गंभीरपणे घेतलं नाही. आणि वयाच्या 71 व्या वर्षी मधु मल्होत्राचे निधन झाल्याची, अशीच तिच्या भूमिकेसारखी छोटीशी बातमी झाली. एक होती मधु मल्होत्रा (जन्म 20 जून 1954. मृत्यू 13 मार्च 2026) इतकेच आपण म्हणू शकतो. दुर्दैवाने तिने महेश आनंदसोबत केलेलं लग्नही फार काळ टिकले नाही. ती त्याची तिसरी पत्नी होती आणि तोही अशाच लहान मोठ्या भूमिका साकारत वाटचाल करीत होता. त्याच्यापासून वेगळे झाल्यानंतर मधु मल्होत्राने चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले होते.































































