पश्चिमरंग – कंचेटोची सुरुवात

<<< दुष्यंत पाटील

कंचेटो  या संगीत प्रकाराची मुळे आपल्याला रेनेसाँस कालखंडात सापडतात. रेनेसाँस कालखंडात कंचेटोया प्रकारचं संगीत नव्हतं, पण या प्रकारच्या संगीतात जी तंत्रं वापरली जातात ती तंत्रं या कालखंडात वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात.

पाश्चात्त्य अभिजात संगीतात ऑर्केस्ट्राने वाजवण्याच्या संगीतातला अतिशय लोकप्रिय असणारा एक प्रकार म्हणजे कंचेटो (Concerto). गेल्या काही शतकांमध्ये कित्येक दिग्गज संगीतकारांनी अनेक अजरामर कंचेटोज रचल्या. कंचेटो  या संगीत प्रकाराची मुळे आपल्याला रेनेसाँस कालखंडात सापडतात. रेनेसाँस कालखंडात ‘कंचेटो’ या प्रकारचं संगीत नव्हतं, पण या प्रकारच्या संगीतात जी तंत्रं वापरली जातात ती तंत्रं या कालखंडात वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात.

ऑर्केस्ट्रामध्ये वादक/गायक यांचे दोन ग्रुप करून एकाच संगीत रचनेतलं एका प्रकारचं संगीत पहिल्या ग्रुपकडून वाजवून/गाऊन, तर त्यापेक्षा वेगळं असं दुसऱ्या प्रकारचं संगीत दुसऱया ग्रुपकडून विशिष्ट प्रकारे वाजवून/गाऊन घेतलं तर संगीतात नाट्यमयता आणता येते. रेनेसाँस कालखंडात हे तंत्र वापरून संगीत रचायला सुरुवात झालेली दिसते. त्या काळात गायक मंडळी, वादक मंडळी यांचे वेगळे समूह बनवले जात. तसेच एका ग्रुपमध्ये फुंकून वाद्य वाजवणारी मंडळी, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये व्हायोलिनसारखी वाद्यं असू शकायची. काही वेळेला एका ग्रुपमध्ये एकच वादक असायचा. खरं तर ग्रुप्सचे हे तंत्र थोड्या प्रमाणात रेनेसाँस कालखंडापूर्वीही काही संगीतकारांनी वापरलं होतं. पण रेनेसाँस कालखंडात पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं हे तंत्र ठळकपणे वापरत संगीत रचना केल्या जाऊ लागल्या. अशा प्रकारच्या रचना इटलीमधल्या व्हेनिस या शहरात दिसू लागल्या.

रेनेसाँस काळात संगीताच्या बाबतीत व्हेनिस हे युरोपमधलं आघाडीचं शहर होतं. या शहरात एक भव्य असं चर्च होतं. या चर्चमध्ये चालणारं संगीत हे व्हेनिसचं एक मुख्य आकर्षण होतं. भव्य आकार असणाऱ्या या चर्चमध्ये संगीताचा कार्यक्रम चालू असताना गायक, वादक यांचे ग्रुप एकमेकांपासून काही अंतरावर असायचे. संगीतकार मंडळींनी याच गोष्टीचा फायदा घेत विशिष्ट प्रकारच्या संगीत रचना करायला सुरुवात केली. यातल्या एका ग्रुपनं रचनेतलं एका प्रकारचं संगीत वाजवलं (किंवा गायलं) की, दुसरा ग्रुप त्यापेक्षा वेगळं असणारं संगीत वाजवायचा (किंवा गायचा). अशा रचनांमध्ये पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप यांच्यात एका प्रकारचा संगीतातला संवाद व्हायचा. या संवादामुळेच हे संगीत अधिकाधिक रंजक बनायचं.

गायकांचे ग्रुप्स बनवून वर वर्णन केलेलं तंत्र मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली ती एड्रियान विलार्ट नावाच्या संगीतकारानं. 1527 साली रोममधल्या एका भव्य चर्चच्या संगीत विभागाचा तो प्रमुख बनला. समूह गायकांचे ग्रुप्स बनवून प्रत्येक ग्रुपकडून आळीपाळीनं गायन करून घेत समूह गायनात संवाद आणण्याचा त्यानं प्रयत्न केला. विलार्टच्या संगीताचा प्रभाव सोळाव्या शतकातल्या नंतरच्या अनेक संगीतकारांवर पडला. संगीत शिकवण्याचंही काम करत असल्यानं त्याच्याकडून संगीत शिकणाऱ्या लोकांवर त्याचा प्रभाव पडणं साहजिकच होतं.

‘कंचेटो’ आणि ‘सिंफनी’ हे शब्द सुरुवातीला गॅब्रिएली नावाच्या संगीतकारानं वापरले. वेगवेगळ्या धार्मिक उत्सवांसाठी होणाऱ्या संगीत कार्यक्रमांसाठी संगीत रचण्याचं काम गॅब्रिएलीनं केलं. त्यानं लिहिलेल्या बऱ्याचशा संगीत रचना आजही उपलब्ध आहेत. त्याच्या सुरुवातीच्या रचनांपैकी ‘O Magnum Mysterium’ या रचनेत समूह गायकांचे ग्रुप्स बनवून संगीत कोणत्या उंचीवर नेता येऊ शकते याची झलक दिसते. त्याच्या बऱ्याचशा संगीत रचनांमध्ये समूह गायकांचे तीन ग्रुप केलेले दिसतात. यापैकी एका ग्रुपला खालच्या पट्टीतल्या गायनाचं, तर एका ग्रुपला वरच्या पट्टीतल्या गायनाचं काम दिलेलं पाहायला मिळतं. तिसरा ग्रुप सर्व पट्ट्यांमध्ये गाताना दिसतो.

गॅब्रिएलीनं फक्त समूह गायनाच्याच रचना केल्या नाहीत, तर त्यानं वाद्य संगीताच्याही बऱ्याचशा रचना केल्या. चर्चमधल्या ऑर्गन या वाद्यासाठी केलेल्या रचना वगळल्या तर त्याच्या उरलेल्या वाद्य संगीताच्या रचनांपैकी आठ ‘सोनाटा’ या नावानं ओळखल्या जातात आणि छत्तीस ‘कॅन्झोना’ नावानं ओळखल्या जातात. गॅब्रिएलीच्या या संगीतातच बरॉक कालखंडातल्या ‘कंचेटो’ या संगीत प्रकारची मुळं सापडतात.

‘कंचेटो’ हा संगीत प्रकार बरॉक कालखंडात लोकप्रिय होण्याच्या बऱयाच आधी गॅब्रिएलीनं आपल्या वाद्य संगीतात वादकांचे ग्रुप बनवून कंचेटो संगीतातली तंत्रं कशी वापरली हे पाहण्यासाठी आपण यूटय़ूबवर त्याची Canzon septimi toni No. 2 ही रचना ऐकू या.

[email protected]