
<<< रविप्रकाश कुलकर्णी
वयाची शंभरी गाठणे ही विशेष गोष्ट मानली जाते. अशा वेळी ज्या कलावंताने आमच्या आयुष्यात हास्याचे मळे फुलवले, एखादी तरी स्मितरेषा मनावर उमटवली अशी ज्यांची ख्याती नि:शब्द हास्यचित्रकार म्हणूनच जास्त आहे, ते शिवराम दत्तात्रेय तथा शि. द. फडणीस हे 29 जुलै 2024 रोजी वयाच्या शंभरीत प्रवेश करत आहेत. गुणविशिष्ट फडणीसांना रसिक मनपूर्वक शुभेच्छाच देतील यात शंकाच नाही. कारण फडणीस ‘हसरी गॅलरी’मुळे ग्यानबापासून ज्ञानोबापर्यंत म्हणजे सर्व स्तरांवरील सगळ्यांचे आवडते झालेले आहेत.
शि. द. फडणीस यांचा हा प्रवास कसा सुरू झाला? त्यांनीच म्हटलं आहे, “खरोखरच मला कल्पनाही नव्हती. त्या वेळी मी आर्टस् स्कूलचा एक विद्यार्थी. सरळ रेषेत चित्रकार होऊ पाहणारा. गंमत म्हणून एके दिवशी सहज एक व्यंगचित्र काढलं आणि तिथेच चुकलं की बरोबर झालं, पण चित्रे काढीत राहिलो एवढं खरं. वाचकांची खुशी ‘हा…हा…हा…, खो…खो…’ इत्यादीमधून ऐकू येऊ लागली. त्या धुंदीत गाफील असतानाच संपादकांनी मला टिळा लावला. व्यंगचित्रकार शि.द. फडणीस! माझं पदविधान व नामकरण एकदमच झालं. मी आर्टस् स्कूलला काय शिकलो, मला काय व्हायचं होतं याची कोणीही चौकशी केली नाही. माझ्यातला व्यंगचित्रकार हा असा सापडला. व्यंगचित्रालाही मग मी जाणीवपूर्वक शोधू लागलो. ती केवळ गंमत राहिली नाही. त्यात नवनिर्मितीचा आनंद मिळू लागला.”
धडपडीच्या या काळात फडणीसांना आधार, उत्तेजन आणि मार्गदर्शन केलं ते ‘हंस’चे संपादक अनंत अंतरकर यांनी. मात्र एका रात्रीत प्रकाशात यावं तसं शि. द. फडणीस मराठी साहित्य जगतात चमकले ते दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांमुळे! दिवाळी अंकांमुळे अनेक लेखक, संपादक कीर्तिमान झाले. मात्र दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांमुळे लोकांच्या नजरेत एकदम भरले फक्त शि.द.फडणीसच. हीच चित्रे जणू त्यांची ओळख ठरली.
खुद्द शि.द. फडणीस त्याबाबत सांगतात, “अनंत अंतरकर यांचा संपादकीय पाठपुरावा विलक्षण होता. आता त्यांना ‘मोहिनी’ 1952 च्या दिवाळी अंकासाठी मुखपृष्ठ हवं होतं. ‘मोहिनी’ हे मासिक त्यांनी नुकतंच सुरू केलं होतं. त्यावर बहुरंगी विनोदी मुखपृष्ठ! त्या वेळच्या बहुसंख्य दिवाळी अंकांची मुखपृष्ठं दीनानाथ दलाल, मुळगावकर, पंडित यांसारख्या मातब्बर कलावंतांनी रंगवलेल्या सुंदर ललनांनी सजलेली असायची. काहींवर चित्रकारांचा लावण्यप्रकाश! पोते व एजंट यांचा विनोदी मुखपृष्ठाबाबत प्रतिकूल अभिप्राय अंतरकरांना माहीत होता. तरीही हा प्रयोग ते करणार होते. खर्चाची जोखीम त्यांची व चित्रपरीक्षा माझी अशा साशंकतेतच मी होकार कळवला व कामाला लागलो. प्रयोग असल्यामुळे कच्चं चित्र पाठवलं. सूचनांसह ते माझ्याकडे फेअर करण्यासाठी कोल्हापूरला आलं. त्या चित्रातला तपशील, ‘एक बस स्टॉप, एक युवती, तिच्या साडीवर मांजराचे प्रिंट. बाजूला युवक उभा. त्याच्या मॅनिलावर उंदराचे प्रिंट…’ हे चित्र आता अनेकांना माहीत आहे. चित्र फेअर केलं व ते मुंबईला हंस प्रकाशनकडे पाठवून दिलं. त्याचं काय होणार याची खात्री नव्हती, पण हे चित्र प्रचंड गाजलं.”
त्याबाबत शि. द. फडणीस कृतज्ञतेने म्हणतात, “माझ्यातला हास्यचित्रकारही अनंत अंतरकर यांनी दाखवून दिला. मनातला अंधार दूर झाला. ‘मोहिनी’ दिवाळी अंक 1952 चे हे मुखपृष्ठ अखेर दिशा देणारं ठरलं एवढं खरं!” यानंतर शि. द .फडणीस यांना कधीही मागे वळून पहावेसे वाटले नाही, किंबहुना त्यांचे पुढचे पाऊल कायम चढतेच राहिले.
यादरम्यान चित्रकारांच्या चित्रांच्या हक्काबाबत त्यांनी समंजसपणे लढा दिला आणि त्यात ते यशस्वी ठरले ही उल्लेखनीय बाब आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे फडणीस यांनी आपल्या कला प्रवासाची कहाणी ‘रेषाटन, आठवणींचा प्रवास’मध्ये सांगितली आणि ज्योत्स्ना प्रकाशनने त्याची निर्मिती केली आहे. आजही तेवढ्याच ताकदीने आणि दमदारपणे ते चित्रं काढत असतात आणि त्यातला ताजेपणा टिकून आहे. असा हा शतायुषी कलावंत असाच आम्हा रसिकांना आनंद देत राहो हीच प्रार्थना आणि त्यांना शुभेच्छा!