
राजस्थानची राजधानी आणि गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका रिक्षाचालकाने एका परदेशी तरुणीला पर्यटकाला हिंदीतील अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील शब्द उच्चारायला लावून तिची फसवणूक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित रिक्षाचालकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शकील (31) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी हा व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये शकील एका पर्यटनासाठी आलेल्या परदेशी तरुणीला हिंदीतील काही वाईट शब्द स्वतःच्या मागे म्हणायला सांगत होता. त्या शब्दांचा अर्थ माहित नसल्यामुळे ती तरुणी ते शब्द पुन्हा उच्चारत होती. पर्यटकांच्या विश्वासाचा फायदा घेऊन त्यांना अशा प्रकारे चुकीची वागणूक देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
जयपूरच्या ‘टूरिस्ट पोलीस स्टेशन’च्या प्रमुख मंजू कुमारी यांनी सांगितले की, “हे वर्तन अत्यंत अयोग्य आणि परदेशी महिला पर्यटकाचा अपमान करणारे आहे.” सोमवारी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेऊन शकीलला गैरवर्तन आणि पर्यटकांचा छळ केल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे स्थानिक गाइड आणि पर्यटन क्षेत्रातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अशा लोकांमुळे देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन होत असल्याचे म्हटले आहे.
राजस्थानमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथके तैनात असतात. मात्र, भाषेचा अडथळा असल्याचा फायदा घेत काही स्थानिक लोक अशा प्रकारे पर्यटकांची थट्टा करतात. या प्रकरणातील आरोपीने केवळ तरुणीला शिवीगाळ करायला लावली नाही, तर त्याचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित केला, ज्यामुळे ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी आता या रिक्षाचालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
‘अतिथी देवो भव’ ही हिंदुस्थानची परंपरा असताना अशा घटनांमुळे पर्यटकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते. प्रशासनाने सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना पर्यटकांशी सौजन्याने वागण्याचे आवाहन केले आहे. तसेच, परदेशी पर्यटकांना कोणत्याही भाषेच्या किंवा मदतीच्या बाबतीत केवळ अधिकृत केंद्रांवरच संपर्क साधण्याचा सल्ला दिला जात आहे.

























































