
दहीहंडी उत्सवाच्या वेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसाला रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली. तक्रारदार हे दहिसर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून काम करतात.
शनिवारी दहीहंडी उत्सव असल्याने ते चारनाका येथे बंदोबस्तासाठी होते. रात्री एक रिक्षाचालक हा प्रवाशाचे भाडे नाकारत होता. त्यामुळे तक्रारदार हे त्याच्याजवळ गेले. त्याने भाडे का नाकारत आहेस अशी विचारणा केली तेव्हा त्या रिक्षाचालकाने तक्रारदार यांच्याशी हुज्जत घातली. तक्रारदार याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो रिक्षाचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. काही कळण्याच्या आत त्याने तक्रारदार यांना ठोसा मारून जखमी केले. त्यानंतर त्या रिक्षाचालकाला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच त्याला अटक केली. अटक करून त्याला नोटीस देऊन सोडून दिले.