
केंद्रीय लोक सेवा आयोग (यूपीएससी) चा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत यवतमाळच्या ऑटो चालकाच्या मुलीने घवघवीत यश मिळवले आहे. अदीबा अनम अश्फाक अहमद असे या मुलीचे नाव आहे. तिने संपूर्ण देशातून 142 वी रँक मिळवली आहे.
अदीबाला जी रँक मिळाली आहे, त्यामुळे ती नक्कीच आयएएस अधिकारी बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अदीबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली महिला मुस्लिम आयएएस होईल. अदीबा ही याआधीही यूपीएससीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचली होती, परंतु अखेरच्या राऊंडमध्ये तिची निवड झाली नव्हती. त्यामुळे तिने हार न मानता पुन्हा जोमाने प्रयत्न करत यूपीएससीची परीक्षा दिली आणि चौथ्या प्रयत्नात तिने 142 वी रँक मिळवली.
अदीबा अनम ही ऑटो चालक अश्फाक अहमद यांची मुलगी आहे. ती लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिने जफरनगर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने जिल्हा परिषद एक्स गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमधून 8 वी ते 10 पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर अदीबाने पुण्यातील इनामदार सीनियर कॉलेजमधून गणितातून बीएससीची पदवी मिळवली. अदीबाने हज हाऊस आयएएस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेतले आहे.
देशातून 142 वी रँक मिळवल्यानंतर अदीबा म्हणाली, अखेर जे लहानपणी स्वप्न पाहिले ते अखेर साकार झाले. खरं म्हणजे मला डॉक्टर व्हायचे होते, परंतु कुटुंब गरीब असल्याने मला डॉक्टर होता आले नाही. तीन वेळा परीक्षा देऊनही यश मिळत नव्हते. त्यामुळे थोडे नैराश्य आले होते, परंतु मी हार मानली नाही. उलट अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे हे यश मिळाले, असे अदीबाने म्हटले. तुम्ही जर कोणतेही मोठे स्वप्न पाहिले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करा. मन लावून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असे अदीबा म्हणाली.