गाडी बंद पडल्यास एका क्लिकवर मिळवा मदत; कशी? वाचा सविस्तर बातमी..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय क्षेत्र ठप्प झाले आहेत. टप्प्या टप्प्याने होणाऱ्या अनलॉकमुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अनलॉकमुळे महीनाभर पार्किंग एरियामध्ये पडून असलेली खासगी वाहने रस्त्यावर येण्यास सुरवात झाली आहे. ही वाहने बऱ्याच कालावधीसाठी न चालवल्याने त्यांच्यात तांत्रिक बिघाड उध्दभवणे स्वाभाविक आहे. तुम्हीही वाहन समस्या संबंधित अडचणींचा सामना करत असल्यास तुम्ही ‘ऑटो आय केअर’ मोबाईल ॲपची मदत घेऊ शकता.

मुंबई स्थित ‘ऑटो आय केअर’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर चालते फिरते गॅरेज उपलब्ध करून दिले आहे. विशेषतः महामार्गांवर प्रवासावेळी गाडी बंद पडली, तांत्रिक बिघाड झाला तर लवकर मदत मिळणे अवघड होते. अशा प्रसंगी ‘ऑटो आय केअर’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाहनचालक मदत मिळवू शकतो तेही अगदी 20 ते 30 मिनिटांत. लॉकडाऊनच्या काळात कार्यरत आपत्कालीन वाहनांसाठी ही यंत्रणा मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. 2019 साली लाँच झालेल्या या मोबाईल ॲपने प्रारंभीक स्वरूपात देशभरातील 18 हजार गॅरेजसोबत टायअप केला असून सध्या देशातील 998 शहरांमध्ये ज्यात 107 स्तरीय 1 आणि 2 स्तरातून 48 हजाराहून अधिक सर्व्हिस सेंटरसोबत वाहतूक सेवेचे जाळे विस्तारले आहे.

प्रवासात वाहन बंद पडल्यास जवळपास गॅरेज शोधणे म्हणजे तारेवरची कसरत. वाहनचालकांची ही समस्या लक्षात घेत थेट गॅरेजच त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची संकल्पना ‘ऑटो आय केअर’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरली आहे. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाहनचालक प्रवासावेळी त्याच्या जवळपास असणारे सर्व्हिस स्टेशन किंवा स्थानिक गॅरेजला ट्रॅक करू शकतो. टायर रिप्लेसमेंट, जंप स्टार्ट, लो फ्युएल, व्हेईकल अनलॉक अशा तांत्रिक समस्या असतील किंवा वाहनात मोठा बिघाड असेल, वाहन गॅरेजपर्यंत घेऊन जायचे असेल तर अशा अनेक समस्यांवर हे ॲप मदत मिळवून देते. या ॲपच्या सहाय्याने मदत मिळवण्यासाठी रिक्वेस्ट केल्यास किती कालावधीत मदत मिळेल याचे रिअल टाईम ट्रॅकिंग, एसएमएस स्टेटस अपडेट, मदतीसाठी येणाऱ्या वाहनचालकाचा संपर्क क्रमांक अशी इत्यंभूत माहिती पुरविली जाते. ‘ऑटो आय केअर’ची सुविधा अगदी माफक दरात उपलब्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या