अवलिया –  करीमसाब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश उदगिरकर

आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दीर्घकाळ रेंगाळणारी, पण मनाच्या अंगणात त्यांच्यातली अपूर्वाई तशीच राहते.  हे  तरल अस्तर उलगडताना भेटलेल्या अवलियांविषयी.

जुन्या लातुरात एक प्रसिद्ध चौक आहे. आझाद चौक! त्यावेळी लातूर हे तालुक्याचे गाव तसे छोटेच होते. माझी पुरणमल लाहोटी शाळा या चौकाच्या लगतच होती आणि पुढे राजस्थान विद्यालयात जातानाही हा चौक ओलांडूनच जावं लागायचं. प्रत्येक वेळी एका बसक्या दुकानासमोर गर्दी दिसायची. एकदा कुतूहलानं मी जवळ जाऊन पाहिलं तर ती पानपट्टी निघाली. करीमसाब की पानपट्टी! त्यावेळी एवढीच माहिती मिळू शकली. नंतर हळूहळू कळत गेलं की, पूर्ण लातुरात ही पानपट्टी नंबर एक होती. शनिवारी अर्धी शाळा असायची. त्यामुळे येताना रेंगाळत घरी यायचो. तेव्हा त्या दुकानासमोरची गर्दी थोडी पातळ झालेली असायची. एरवी गर्दीमुळे दुकानातलं काहीच दिसायचं नाही, पण शनिवारी दुपारी मात्र थोडं नजरेला पडायचं. एक काळसर माणूस पान लावताना दिसायचा. त्याच्या बाजूला एक तरुण त्याचा मदतनीस म्हणून असायचा. त्या माणसाच्या हाताला खंड नसायचा. सतत हात चालायचा. चेहऱयावर समाधानी भाव असायचे. राजस्थान विद्यालयात मी शेवटपर्यंत म्हणजे दहावीपर्यंत होतो. अजून अकरावी-बारावीचा काळ यायचा होता. म्हणजे प्रदीर्घ काळ मी आझाद चौकातून येत जात होतो, पण करीमसाबच्या पानपट्टीवरची गर्दी कधीच हटली नाही. विद्यार्थीदशेत दुकानावर जाऊन पान वगैरे खाण्याची आमची शामत नव्हती. पण उत्सुकता जरूर होती. पुढे कॉलेज जॉइन केलं तेव्हा आमचा पत्ता बदलला होता. थोडा धीटही झालेलो होतो आणि एके दिवशी इकडे तिकडे पाहत त्या दुकानावर गेलो आणि एका साध्या पानाची ऑर्डर दिली. करीम साहेबांकडे नीट पाहिलं. अंगात एकही डाग नसलेला शुभ्र सदरा आणि विजार. डाग पडू नये म्हणून गळ्याभोवती कपडा बांधलेला आणि वर मफलर! चेहरा दगडी असला तरी प्रसन्न भावामुळे हसरा दिसणारा. माझे पान तयार करून त्यांनी ज्या नजाकतीने माझ्या समोर धरले ते मला प्रचंड आवडलं. त्यावेळी ते पान पाच पैशांना मिळायचं. माझ्याकडे पाहून ते हसले,

“अब दिखते नही?”

मी चाट!

“आप मुझे जानते है?”

“हां, हां, आप बाबुराव गुरुजी के बेटे हो ना?” मी थोडा गांगरलो.

“घबराईये नही! आप स्कूल जाते आते थे तबसे हम आपको देखा करते थे!”

ही माझी त्यांची पहिली भेट आणि त्यानंतर कधीतरी भेट झाली तर माझ्याकडे ओळखीच्या नजरेने पाहून हसायचे. नंतरच्या काळात माझा त्यांच्याशी फारसा संबंध आला नाही, पण आमच्या घरासमोर जेव्हा एक आलिशान बंगला उभा राहिला तेव्हा कळलं की, हे घर करीम साहेबांचं आहे आणि आता त्यांची पानाची अडत आहे. अत्यंत कष्टाने त्यांनी हे वैभव मिळवलं होतं.

नंतर मी परभणीला आलो, बँकेत लागलो तेव्हा लातूरवर ड्राफ्ट काढण्यासाठी एक गृहस्थ आले. ड्राफ्ट करीम साहेबांच्या नावावर होता.  मी त्यांना सहज माझ्या आणि त्यांच्या ओळखीबद्दल बोललो. तिसऱया का चौथ्या दिवशी ते गृहस्थ बँकेत आले आणि त्यांनी माझ्या हातात एक दुरडी ठेवली.

“ ये क्या है?” मी विचारलं.

“करीमसाब से मेरी बात हुई, आपका जिकर किया तो उन्होने आपके लिये ये तोहफा भेजा है !”

मी दुरडी उघडली. आत शंभरएक निवडून काढलेली कोवळी नागवेलीची पाने! एवढय़ा पानांचं मी काय करणार होतो? पण मला अप्रूप वाटलं.

पुढे बऱयाच दिवसांनी लातूरला गेलो होतो, मित्रांना भेटायला  रस्त्याने रमत गमत पायी चाललो होतो. तेवढय़ात माझ्या बाजूला एक पांढरी कार येऊन उभी राहिली. मी दचकून पाहिलं, तर करीम साब खाली उतरत होते!  त्यांच्या जवळ एक पिशवी होती. मला पाहून त्यांनी अत्यंत अदबीने सलाम केला. मी शरमून गेलो. त्यांनी पिशवीत हात घातला आणि एक पानाचा विडा माझ्या हातात दिला.

“करीमसाब ….”   मला काय बोलावं कळेना.

“ अभी हम पान लगाते नही. बेपारमे मश्रुफ रहते है. फिर भी जिनके बदौलत मुझे बरकत मिली, उनको हम कैसे भूल सकते है? हम रोज घर पे ही पचास बिडे तयार करते है, और रस्ते मे जो भी हमारा खुदा याने पुराना गिऱहाईक देखते है, हम उन्हे शुािढया की तौर पर एक बिडा नजर करते है. आप सलामत रहे!”

एवढे बोलून त्यांनी परत एकदा आदाबअर्ज केला आणि गाडीत बसले. मी किंकर्तव्यमूढ… विचार करू लागलो, यांच्याकडे मी फार तर दोनचारदा गेलो असेन. तरी मला यांनी लक्षात कसं ठेवलं?

माझ्या लहानशा सामान्य आयुष्यात मला ज्या व्यक्ती भेटल्या त्यांनी मला अपार आनंद दिला. कधी समाधान मिळवून दिलं, कधी चकित केलं, पण ज्या ‘अनाकलनीय’ वाटल्या, त्यात करीमसाब अग्रस्थानी होते.

[email protected]