
कोरोनाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला असला तरी लॉकडाऊनच्या काळात लोक सर्वाधिक वेळ घरातच राहतात. त्यामुळे अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोविकारतज्ज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात काही गोष्टी कटाक्षाने टाळण्याची गरज आहे. या गोष्टी टाळत आरोग्यदायी दिनचर्या ठेवल्यास मनस्वास्थ टिकवण्यास त्याचा फायदा होणार आहे.
आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कामकाजाच्या वेळा बदलल्याने अनेकांना त्रास होत असल्याचे मनोविकारतज्ज्ञांनी सांगितले. तसेच या काळात अनेकांची जीवनशैली सुखासीन झाली असून शरीराला वाईट सवयी लागल्याने मानसीक स्वास्थावरही त्याचा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सवयींमध्ये बदल झाल्याने बॉ़डीक्ल़ॉकवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अनेकांना निद्रानाशाचा त्रास जडला आहे. रात्रभर झोप येत नसल्याने तणाव वाढणे, निराशा वाढणे असा त्रास होत आहे. हे सर्व टाळण्यासाठी योग्य दिनचर्येचे पालन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. दिवसा झोपणे कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे, असे मनोविकारतज्ज्ञ आणि सिडणी विद्यापीठातील मेडिसीन विभागाचे प्रमुख प्रो. निक ग्लोजियर यांनी सांगितले. दिवसा झोप घेण्यास सुरवात करणे ही तुमचे बॉडीक्लॉक बिघडण्याची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.
मानसीक स्वास्थ जपण्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. त्यामुळे दुपारची झोप टाळून प्रत्येकाने रात्री सलग साडेसात तासांची झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटेल आणि लॉकडाऊनमुळे येणाऱ्या उदासीचा किंवा तणावाचा सामना करण्याची मानसीक तयारी होते. लॉकडाऊनच्या काळात वेळ मिळाला म्हणून झोप काढणे योग्य नाही, ही आपल्या झोपेची वेळ नाही, याची जाणीव बॉडीक्लाॉकला असते. त्यामुळे झोप येत नाही आणि अस्वस्थता वाढत जाते. तसेच थकवा वाढतो आणि अशा अवेळी झोपेमुळे लठ्ठपणातही वाढ होते. त्यामुळे वाचन, चिंतन, मनन, मुलांसोबत खेळणे, कुटुंबियांशी गप्पागोष्टी करणे, नव्या गोष्टी शकणे, विविध उपक्रमात स्वतःला दिवसभर गुतंवून ठेवावे आणि नेहमीच्या झोपण्याच्यावेळीच झोपावे असा सल्ला निक यांनी दिला आहे. अनेकजण दुपारी वामकुक्षी घेतात. यामुळे नियमित कामकाज सुरू झाल्यावर अनेकांना त्याचा त्रास होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच झोपताना मोबाईल बघणे कक्षाटाने टाळण्याचा सल्ला मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे.
सुखासीन जीवनशेली टाळून घरच्याघरी व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, असे त्यांनी सांगितले. या काळत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून नव्या गोष्टी शिकण्याचा सल्लाही मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे. या काळात आळस टाळणे गरजेचे असल्याचेही निक यांनी सांगितले. आळस दूर ठेवल्यास रक्तप्रवाह सुरळित राहतो, श्वासोश्वास सुरळित होतो. त्यामुळे हृदयाचे कार्यही चांगल्याप्रकारे चालते. त्यामुळे ल़ॉकडाऊनच्या काळात काही गोष्टी कटाक्षाने टाळून आरोग्यदायी दिनचर्या ठेवल्यास ताणतणाव जाणवणार नाही, असे निक यांनी सांगितले.


























































