
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जूनला दरवर्षी ‘कार्टून कट्टा-महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुप’ पुण्यात तसेच इतर शहरांत व्यंगचित्रांचे प्रदर्शन आणि कार्यशाळा घेत असतो. या उपक्रमाद्वारे व्यंगचित्रांमधून पर्यावरणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा मुख्य उद्देश असतो. कोरोनामुळे या वर्षी कोणत्याही कलादालनात व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार नाही. त्यामुळे ‘कार्टून कट्टा’तर्फे देशभरातील निवडक व्यंगचित्रकार आपापल्या व्यंगचित्रांमधून पर्यावरणविषयक जनजागृती करणार आहेत. ही सर्व व्यंगचित्रे ई-बुक, ऑनलाइन व्यंगचित्र प्रदर्शन आणि स्लाईड शोच्या माध्यमातून सोशल मीडियावर 4 ते 6 जूनदरम्यान प्रत्येक राज्यातून प्रसारित केली जाणार आहेत. हे व्यंगचित्र प्रदर्शन www.facebook.com/groups/384435731999922/?ref=share या लिंकवर पाहता येणार आहे अशी माहिती ‘कार्टून कट्टा ग्रुप’चे संयोजक घनश्याम देशमुख यांनी दिली.






























































