अयोध्या नगरी सजली… मंगळवारी ध्वजारोहण! कडक सुरक्षा तैनात; कार्यक्रमात मोबाईल बंदी

अयोध्येतील राम मंदिराचे निर्माणाचे काम पूर्ण झाले असून प्रभू श्रीराम मंदिरावर मंगळवारी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ध्वजारोहणाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट उंच स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद ध्वज फडकवण्यात येणार आहे. जो तीन किलोमीटर अंतरावरूनही दिसेल. ध्वज फडकविण्यासाठी स्वयंचलित ध्वज फडकवण्याची व्यवस्था बसवण्यात आली आहे. या ध्वजरोहण सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली असून ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

राम मंदिरात पहिल्यांदाच राम-सीता विवाह उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी अंदाजे 8,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यापैकी 2500 लोकांना सामावून घेण्यासाठी तीर्थपुरममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व पाहुण्यांना सकाळी 8 ते 10 च्या दरम्यान मंदिरात प्रवेश करावा लागेल. त्यांना मोबाईल आणण्याची परवानगी नाही, दिल्ली स्फोटानंतर हा मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. देश आणि जगभरातून अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी 5,000 हून अधिक खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येतील प्रमुख मंदिरांमधून भव्य राम मिरवणूक काढण्यात येईल. संपूर्ण अयोध्येतील कनक भवन, मणिरामदास छावणी, रामवल्लभकुंज, रंगमहल, जानकी महाल, श्री रामदर्शन कुंज आणि लक्ष्मण किल्ला यासह 12 मंदिरांमधून भगवानांची मिरवणूक काढली जाईल.

पॅराशूट कापडापासून बनवला ध्वज 

राम मंदिरात फडकला जाणारा ध्वज अहमदाबादमधील कारागिरांनी बनवला आहे. हा ध्वज एका खास नायलॉन पॅराशूट फॅब्रिकपासून बनवला आहे. या ध्वजाला ऊन, वारा, पाऊस यापासून काहीच नुकसान होणार नाही. हा ध्वज उंच ठिकाणी असल्याने तो अयोध्येत पोहोचल्यानंतर दूरून नजरेस पडणार आहे.

पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येत

पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा तीन तासांचा असेल. ते सकाळी 11 वाजता राम मंदिरात पोहोचतील. ते हनुमानगढीला भेट देतील आणि तेथे पूजा करतील. ते रामलल्ला आणि राम दरबारालाही भेट देऊन आरती करतील. पंतप्रधान सप्त मंदिर परकोटा, शेषावतार मंदिर आणि रामायणातील श्री डी भित्तिचित्रांनाही भेट देतील. त्यानंतर ते मंदिरावर काम करणाऱ्या अभियंते आणि कामगारांना भेटणार आहेत.

महायज्ञाचे संचलन नाशिकच्या वेदमूर्तींकडे

नाशिकमधील महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठानचे प्रधान अध्यापक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी यांच्यावर सर्व विधी-पूजा कर्म सांगण्याची जबाबदारी यज्ञ समितीने सोपवली आहे. वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांनी अयोध्येत झालेल्या 22 जानेवारीच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी यजुर्वेदाच्या स्वाहाकाराचे 108 वैदिक विद्वानांसमवेत पूर्ण संचलन केले होते.