घटनात्मक मूल्ये जपून अयोध्येचा निकाल द्या!- मुस्लिम पक्षकार

567
supreme-court-of-india

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालात देशाच्या महान घटनात्मक मूल्यांचे प्रतिबिंब दिसू द्या, या मूल्यांना धक्का न लावता निकाल द्या अशी विनंती मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाला केली. घटनात्मक मूल्यांना धक्का लागला तर त्याचा यापुढील अनेक पिढय़ांवर विपरीत परिणाम होईल, देशाच्या उदार धोरणाला धक्का लागेल, असेही म्हणणे त्यांनी मांडले आहे.

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाच्या ऐतिहासिक निकालाची संपूर्ण देशवासीयांना प्रतीक्षा आहे. न्यायालयाने सुनावणी संपल्यानंतर पुढील 23 दिवसांच्या आत निकाल देऊ असे जाहीर केले होते. याचदरम्यान आता मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयाला घटनात्मक मूल्यांना धक्का न लावता अयोध्येचा निकाल देण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्यास सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने मुस्लिम पक्षकारांना मुभा दिली. इतर पक्षकार आणि न्यायालयाच्या रजिस्ट्रींनी अशाप्रकारे लेखी म्हणणे मांडण्यावर आक्षेप घेतला होता असे वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी सांगितले. त्याची न्यायालयाने दखल घेतली.

धर्मनिरपेक्ष संस्कृतीचा न्यायालय आदर राखेल!

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालय आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्ष तसेच विविध संस्कृतींच्या मूल्यांचा आदर करेल अशी अपेक्षाही मुस्लिम पक्षकारांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या