
रामजन्मभूमीप्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात वाल्मिकी रामायण, स्कंद पुराण आणि रामचरितमानस या धार्मिक ग्रंथांचा उल्लेख करण्यात आला आहे. या ग्रंथातील श्लोक आणि चारोळय़ांचा उल्लेख या खटल्यातील पुरवणी पानांमध्ये पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत. निकालपत्रात एकूण 929 पाने असून त्यात 116 पुरवणी पाने जोडण्यात आली आहेत. पुरवणी पानांमध्ये 40 व्या नंबरवर वाल्मिकी रामायण, 41 व्या नंबरवर स्कंद पुराण आणि 73 व्या नंबरवर रामचरित मानसमधील चारोळय़ांचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात प्रभू राम यांचे जीवनचरित्र उलगडून दाखवणारा सगळय़ात महत्त्वाचा आणि जुना ग्रंथ म्हटले आहे. निकालपत्रात वाल्मीकी रामायण हा ग्रंथ इ.स. 300 ते 200 वर्षांपूर्वीचा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा ग्रंथ महाभारत आणि श्रीमद् भगवतगीता यांच्यापेक्षाही जुना असल्याचे म्हटले आहे.


























































