
सामना प्रतिनिधी । देवगड
कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा मिळावा म्हणून गेले अनेक दिवस आपले प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना आता यश येऊन कुणकेश्वर देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाला असल्याची माहिती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
कुणकेश्वरला ब वर्ग दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी मंत्रालयस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. कुणकेश्वर येथील देवस्थान कमिटी तसेच ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या प्रयत्नांना आता यश आले असून नुकतीच ग्रामविकास मंत्रालयाच्या झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे या क्षेत्राचा विकास आता झपाट्याने होणार असून येथे येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना ही उत्तम सुविधा प्राप्त होणार आहेत. यासाठी आपण वारंवार पाठपुरावा केला होता. याचा प्रस्ताव तयार करून घेतल्यानंतर मंत्रालय पातळीवर यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रस्तावात राहिलेल्या त्रुटी पूर्ण करून दिल्या. या पाठपुराव्याला यश आले असून या स्थळाला ब वर्ग दर्जा मिळाला आहे, असे जठार यांनी म्हटले आहे.
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन श्री क्षेत्र कुणकेश्वर तसेच देवगड तालुक्यातील मुणगे गावातील श्री भगवती देवी मंदिर या दोन्ही देवस्थानांसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी केली असता मुंडे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. या निधीतून याठिकाणी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचेही माजी आम. जठार यांनी सांगितले आहे.

































































