
सामना प्रतिनिधी । नांदेड
‘राम मंदिर हा हिंदुस्थानवासियांच्या श्रध्देचा प्रश्न आहे. तो कोणताही राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर बनविण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे आणि तसे झाले नाही तर जनताच राम मंदिर बनवेल. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल’, असा विश्वास योगगुरु रामदेव बाबा यांनी आज येथे व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक शिबिराच्या पार्श्वभूमीवर बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस ते संबोधित करीत होते. या पत्रकार परिषदेस खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे उपस्थित होते.
रामदेव बाबा पुढे म्हणाले की, ‘राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रध्दा आहे. राम मंदिर आम्ही मक्केत किंवा व्हॅटीकनसिटी मध्ये बांधा असे म्हणत नाही. राम हे देशातील प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत, ते हिंदूचे, मुसलमानाचेही पूर्वज आहेत. 1947 पूर्वी तर हा देश एकच होता आणि म्हणूनच माझे ठाम मत आहे हिंदू आणि मुसलमान यांचा डिएनए एकच आहे.

योगाबद्दल बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, योगासने ही केवळ उपचार पध्दती किंवा व्यायाम पध्दती नाही. तर ती जीवनपध्दती आहे. योगामुळे फक्त रोगच दूर होतात असे नाही तर जगण्याची पध्दत योग संस्कारामधून सांगितली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे योग आंतरराष्ट्रीय विषय झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. पूर्वी 188 देश योगाचे आचरण करीत होते. आता 200च्यावर राष्ट्रे योगाभ्यास करतात. योगाचे महत्व आता मुस्लिम देशांनाही पटले असून, काही मुस्लिम देशातही योगास मान्यता देण्यात आली आहे.






























































