बबनराव लोणीकरांचे आक्षेपार्ह वक्तव्य; महिला तहसीलदाराचा उल्लेख ‘हीरोईन’ असा केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदाराच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सर्वच थरांतून खासकरून महिला संघटनांकडून निषेध झाला. मात्र लोणीकरांनी माफी न मागता आक्षेपार्ह वक्तव्यावर फक्त शब्दांचे खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोणीकर चांगलेच अडचणीत आले असून भाजपकडून त्यांच्याविरोधात कारवाई होते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जालनाच्या देवगावमध्ये शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात ते शेतकऱयांच्या नुकसानभरपाईबद्दल बोलत होते. नुकसानभरपाईच्या मागणीसाठी मोर्चा काढताना मोर्चासाठी कोणाला आणायचे, असा सवाल उपस्थित करताना त्यांची जीभ घसरली. मोर्चासाठी हीरोईन आणू का, असा प्रश्न विचारला आणि व्यासपीठावरील महिला तहसीलदारांकडे बघत म्हणाले, या तहसीलदार हीरोईनसारख्याच दिसतात. कुणी हीरोईन मिळाली नाही तर तहसीलदारालाच घेऊन येतो. त्यांनाच निवेदन देऊ असे वक्तव्य केल्याने उपस्थित असलेले शेतकरीही अवाक् झाले.

लोणीकरांच्या या संभाषणाची क्लिप व्हायरल होताच महिलावर्गात संतापाची लाट उसळली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही आक्षेप घेतला आहे. सत्ता गेली तरी सत्तेचा माज उतरला नाही अशा शब्दांत रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.