
इतिहासाविषयी प्रचंड अभिमान, सत्य तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखनप्रतिभा आणि वत्तृत्वकला या गुणविशेषांनीही समाजात त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवले होते. सखोल अभ्यासासह शिस्तबद्धता, वक्तशीरपणा अशी त्यांच्या स्वभावाची वैशिष्टय़े होती.
बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे पुणे जिह्यातील सासवड हे मूळ गाव. 29 जुलै 1922 रोजी त्यांचा जन्म झाला. तरुणपणापासून ते पुण्यात स्थायिक झाले आणि येथून ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहास संशोधक ग. ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले आणि बाबासाहेबांची इतिहास संशोधक म्हणून वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन 1740 ते 1761’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.
बाबासाहेबांनी वयाच्या 17 व्या वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर लिखाणाला सुरुवात केली. त्यांनी 2015 सालापर्यंत बारा हजारांहून अधिक व्याख्याने दिली. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपका&त होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय त्यांचे मेहुणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटपंती करीत. दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. त्यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाटय़लेखन केले. ‘जाणता राजा’ या नाटकाचे दिग्दर्शनही केले.
‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे 27 वर्षांत 1250हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली. हे नाटक हिंदी–इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले. ‘जाणता राजा’मध्ये 150 कलावंत काम करतात. शिवाय हत्ती–घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी साधारणः 5 दिवस लागतात.
बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. ‘महाराष्ट्रभूषण’ या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतील फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशांत आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम पॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली. एकूणच त्यांचा हा प्रेरणादायी जीवनप्रवास, इतिहास जिवंत ठेवण्यासाठी सतत तळमळ दाखवणारे व्यक्तिमत्त्व यामुळे बाबासाहेब पुरंदरे हे नावही महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर असेल.
शिवचरित्र अजून समजून घ्यायचंय!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा 29 जुलै रोजी 99 वा वाढदिवस होता. यानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले होते, शिवचरित्राविषयी अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे.
हौस असलेला आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षा असलेला माणूस कधीही समाधानी नसतो. मी आनंदी असलो तरी समाधानी नाही. खूप काम करावे असे वाटते. पण, प्रकृती साथ देत नाही. सगळे लोक प्रेमाने भेटतात. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहिण्याची इच्छा आहे. सर्वांना घेऊन रायगडावर जायचे आहे.
शंभरावे वर्ष लागले. त्यासाठी मी वेगळे काही केले नाही. मी शंभर वर्षे जगावे ही जणू विधात्याची इच्छा होती. मला कसलेही व्यसन नाही. आणखी मला दोन-तीन वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की आजारी पडू देऊ नको. इथं दुखतंय, तिथं दुखतंय असं काही नको. अगदी छान स्वतः हलतोय, स्वतः बोलतोय, स्वतः चालतोय असे स्वावलंबी जीवन मला लाभावे, अशीच माझी इच्छा आहे.



























































