बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर 15 दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत, सरकार मुली व महिलांचे रक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शासन व प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना वाढत आहेत. याला सर्वस्वी मुख्यमंत्री व गृहमंत्री जबाबदार आहेत म्हणून दोघांनीही राजीनामे द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता, पण मुंबई उच्च न्यायालयाने बंद करण्यास मनाई केल्यानंतर राज्यभर काळ्या फिती लावून मूक आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, CWC सदस्य व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भर पावसात ठाण्याच्या गांधी चौकातील आंदोलनात भाग घेतला.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, युती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. सरकारला जनतेचे माता भगिणींच्या सुरक्षेचे काही पडलेले नाही फक्त राज्याला ओरबाडून खाण्याचे काम सुरू आहे. आपल्या माता भगिणींच्या सुरक्षेसाठी आता या सरकारला घालवावे लागणार आहे.
नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांनी संविधान चौकात मुक आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून जानेवारीपासून आतापर्यंत 2141 महिला मुलींवर अत्याचार झाले आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या जिल्ह्यातच कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बदलापूर प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला. उच्च न्यायालयाने महायुती सरकारचे थोबाड लाल केले व जनतेने उद्रेक केल्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. विकृत, चोर, लुटारू, दरोडोखोर सरकारचा निषेध करण्यासाठी व आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी, यासाठी हे आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे.
विधान परिषदचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोल्हापूरात मूक आंदोलन केले. आ. जयश्री पाटील, आ. आमदार ऋतुराज पाटील, आ. राजूबाबत आवळे, आ. जयंत आसगावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते. अमरावती येथे माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे यांनी आंदोलनात भाग घेऊन सरकारचा निषेध केला. नाशिक येथील आंदोलनात शहर काँग्रेस अध्यक्ष अँड आकाश छाजेड खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांनी सहभाग घेतला. मुंबईतील नागपाडा जंक्शन येथे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन, दादर येथे आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार डॉ. मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकिम, राजन भोसले, सचिव श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.