
सामना ऑनलाईन । मुंबई
बाहुबलीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. प्रेक्षकांना बाहुबलीचा सिक्वेल बघितल्यानंतर प्रीक्वेल बघायला मिळणार आहे. म्हणजे महिश्मतीच्या साम्राज्याला भेट देण्याची आणि शिवगामीचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. लवकरच नेटफ्लिक्सवर ‘बाहुबली- बीफोर द बिगिनिंग’ ही बेवसीरिज सुरू होणार आहे. आनंद निलकांता यांच्या ‘द राईज ऑफ शिवगामी’ या पुस्तकावर आधारित ही वेबसीरिज आहे.

नेटफ्लिक्सने बाहुबलीच्या प्रीक्वेल सीरिजची आज घोषणा केली. शिवगामीवरील ‘द राईज ऑफ शिवगामी’ ही नऊ भागांची वेबसीरीज आहे. यामध्ये बंडखोर, सूडबुद्धीने वागणारी मुलगी ते बुद्धिवान, धाडसी, अद्वितीय राजकन्या असा शिवगामीचा उदय बघायला मिळेल. नेटफ्लिक्स आणि बाहुबली चित्रपटाच्या टीमने एकत्र येऊन वेबसीरिजची निर्मिती केली आहे. अर्क मीडिया वर्क आणि राजमौली यांचाही समावेश आहे. देवा कट्टा आणि प्रवीण सतारु हे सहदिग्दर्शक आहेत. बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली यांनी भव्यदिव्य, खिळवून ठेवणारी मालिका तयार होत असल्याचे माहिती दिली. परिपूर्ण असे हिंदुस्थानी महाकाव्य जगभरात पोचेल, असा विश्वास व्यक्त केला. बाहुबलीचे साम्राज्य व्यापक आणि भव्य आहे. याआधी दोन्ही चित्रपटांतील पात्रंही तितकीच लार्जर दॅन लाईफ प्रतिमेची आहेत. दोन्ही चित्रपटांतील कथानकांपेक्षा खूप अशी नाट्यपूर्ण कथा वेबसीरिजमधून प्रेक्षकांना बघायला मिळेल, असेही राजमौली यांनी सांगितले. नेटफ्लिक्सचे उपाध्यक्ष एरिक बारमॅक यांनी बाहुबलीच्या निमित्ताने प्रतिभावंत लेखक आणि निर्माते यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.


























































