चेन्नई ओपन 2025 ला बजाजकडून प्लॅटिनम प्रायोजकत्व

टेनिस खेळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बजाज समूहाने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2025 साठी प्रायोजकत्व देत असल्याची घोषणा केली आहे. हिंदुस्थानातील उदयोन्मुख टेनिसपटूंचे मनोबल, प्रोत्साहन वाढवण्यासाठी तामीळनाडू टेनिस असोसिएशनतर्फे (टीएनटीए) टेनिसपटूंच्या विकासासाठी राबविल्या जात असलेल्या ‘द नेक्स्ट लेव्हल’ या मोहिमेला पाठबळ देण्यासाठी बजाज ग्रुपने असोसिएशनसोबत भागीदारी केली आहे. या मोहिमेंतर्गत टीएनटीएने निवडलेल्या अव्वल दहा प्रतिभावंत टेनिसपटूंना स्पर्धात्मक टेनिसचा अनुभव मिळण्यासाठी व्यापक मदत केली जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बजाज समूह चार युवा महिला टेनिसपटूंना सहाय्य प्रदान करणार आहे. युवा टेनिसपटूंच्या प्रतिभेला आणखी फुलविण्यासाठी बजाज समूह आगामी काही वर्षांत टीएनटीएच्या साथीने एक व्यापक विकास योजनेला सहाय्य करणार आहे. ‘आमच्यासाठी टेनिस हा खेळापेक्षाही अधिक महत्त्वाचा घटक आहे. हा खेळ बजाज समूहात दिसणारी निष्पक्षता, चपळता आणि लवचिकता या भावनांना अधोरेखित करतो,’ असे बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी नमूद केले.