
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा उद्या 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी पालिकेच्या उद्यानात होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे यावर्षी ऑनलाइन घेण्यात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज स्पष्ट केले. या स्पर्धेत पालिका क्षेत्रातील सर्व भाषिक पालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.
पालिकेच्या माध्यमातून आणि महापौर आयोजित मुंबईत 2009 पासून जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
या स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून स्पर्धा चार गटात घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.balchitrakala.comed या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ए – 3 किंवा ए- 4 आकाराच्या कागदावर गटानुसार चित्र काढावे.
चित्राच्या समोरील बाजूस आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, मोबाईल नंबर व गट क्रमांक मराठी किंवा इंग्रजी भाषेतच लिहावा. 10 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेपर्यंत दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावे. चित्र अपलोड केल्यावर सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करायचे आहे. तसेच सदर स्पर्धा ही पूर्णपणे निःशुल्क आहे.
6 लाख 90 हजारांची रोख पारितोषिके
प्रत्येक गटात दरवर्षीप्रमाणेच प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय पारितोषिक 20 हजार, तृतीय पारितोषिक 15 हजार व दहा उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी पाच हजार आणि वॉर्ड स्ततरावर पाचशे रुपयांची पाचशे पारितोषिके मिळून एकूण सहा लाख 90 हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावर्षी एक लाख विद्यार्थी सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेचे गट पुढीलप्रमाणे
गट क्रमांक 1 – इयत्ता 1ली ते 2री
गट क्रमांक 2 – इयत्ता 3री ते 5वी
गट क्रमांक 3 – इयत्ता 6वी ते 8वी
गट क्रमांक 4 – इयत्ता 9वी ते 10वी




























































