शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रासाठी 5 कोटी

388

मुंबई विद्यापीठाच्या विकासकामांकरिता राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत व सरकारकडून 30 कोटी 36 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानापैकी आतापर्यंत 17 कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान विद्यापीठास उपलब्ध करून दिले आहे. उर्वरित 16 कोटी 96 लाख रकमेचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यानंतर ते अनुदान उपलब्ध करून देता येईल, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

राज्य सरकारतर्फे दरवर्षी मुंबई विद्यापीठाच्या विकासकामांसाठी मुंबई विद्यापीठास विविध प्रकाराचे अनुदान देण्यात येते. यापैकी प्रलंबित अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांच्यासह अनेक आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यास लेखी उत्तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वरील माहिती दिली.

मुंबई विद्यापीठाच्या ‘प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट ऍण्ड युथ मूव्हमेंट’ या केंद्रासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी 6 कोटी या केंद्रास वितरित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’करिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेले आहे. त्यापैकी या अध्यापन केंद्रास 1 कोटी वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम मुंबई विद्यापीठाकडून प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर देण्यात येणार असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या