
आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे, असा जोरदार टोला महसूलमंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज लगावला आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली होती. कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षे चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे असा विश्वासही व्यक्त केला.
केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले कृषी कायदे हे अन्यायकारक आहेत. हे कायदे भांडवलदारांचा फायदा करून देणारे आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्राचा संदर्भ दिला जातो आहे. तो संदर्भ देणाऱ्यांनी ते पत्र जरुर नीट वाचावं. त्यावेळी शरद पवार यांनी ते पत्र शेतमालास योग्य किंमत मिळावी आणि जनतेला ती उत्पादनं स्वस्त मिळावीत या अनुषंगाने ते पत्र लिहिलं होतं. आधी त्या पत्राचा नीट अभ्यास करावा, असेही त्यांनी म्हटले.

























































