स्वातंत्र्यदिनी भाजपच्या 3 नेत्यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना उत्तरप्रेदशात भाजपच्या 3 बड्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. बलिया जिल्ह्यातील सुखपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील बेरूअरबारी ब्लॉकच्या गेटवर एका टोळीने एक पत्र चिकटवले होते. त्या पत्रात भाजपच्या आमदार केतकी सिंह यांच्यासह तिघांना जीवे मारण्याची धमकी लिहिली होती. पोलिसांना माहिती मिळताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सुखपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बेरूअरबारी ब्लॉकच्या गेटवर 10 रुपयांची नोट आणि एक धमकी पत्र आढळून आले. ज्यामध्ये भाजपच्या बनसडीह विधानसभेच्या आमदार केतकी सिंह आणि गढवार पोलीस स्टेशन हद्दीतील गढवारचे रहिवासी भानू दुबे, शुभम चौबे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ‘ज्याप्रमाणे बनसडीहमध्ये हत्येची घोषणा करण्यात आली होती, त्याचप्रमाणे गढवाडचे आमदार केतकी सिंह, भानू दुबे आणि शुभम चौबे यांची हत्या केली जाईल. जर जिल्हा प्रशासन आम्हाला रोखू शकत असेल तर त्यांनी रोखून दाखवावे’, असे त्या पत्रात लिहिले होते.

दरम्यान या धमकीबाबत दखल घेत पोलिसांनी बुधवारी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 153 (3) अन्वये गुन्हा दाखल केला. याची माहिती पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

जीवे मारण्याचे धमकी पत्र मिळाल्यानंतर आमदार केतकी सिंह यांनी प्रथम प्रतिक्रिया दिली. ‘हे प्रकरण माझ्या निदर्शनास आले आहे, मला त्या व्यक्तीचा फोटो देखील मिळाला आहे. याबाबत मी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आहे. त्यामुळे ज्याने कोणी हे केले असेल त्य़ाची चौकशी सुरू करू आणि त्याला अटक करू, असे त्या म्हणाल्या.