
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचारात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. फुटीरतावादी गटांनी केलेल्या समन्वित हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल १४५ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या ४० तासांच्या संघर्षात सुरक्षा दलाचे १७ जवान आणि ३१ सामान्य नागरिकांसह एकूण ५० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बलुचिस्तानमधील फुटीरतावादी गट ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (BLA) या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी या मोहिमेला ‘हिरोफ’ (Herof) किंवा ‘काळे वादळ’ असे नाव दिले होते. दहशतवाद्यांनी रुग्णालय, शाळा, बँका आणि बाजारपेठांमध्ये घुसून बेछूट गोळीबार केला. विशेष म्हणजे, हल्ला करण्यासाठी दहशतवादी सामान्य नागरिकांच्या वेशात आले होते आणि त्यांनी नागरिकांचा मानवी ढाल (Human Shield) म्हणून वापर केल्याचे पाकिस्तानचे गृह राज्यमंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले.
एकाच वेळी अनेक शहरांवर हल्ले
मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा, ग्वादर, मस्तुंग आणि नोश्की यांसारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे हल्ले करण्यात आले. दहशतवाद्यांनी लष्करी तळांना लक्ष्य केले, आत्मघातकी हल्ल्यांचे प्रयत्न केले आणि मुख्य रस्ते रोखून धरले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादविरोधी पथकाने (CTU) मोठी मोहीम हाती घेतली. शनिवारी ९२, तर शुक्रवारी ४१ दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्कराने दिली आहे.
हिंदुस्थानवरील आरोपाचे हिंदुस्थानकडून खंडन, चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानच्या लष्कराने आणि संरक्षण मंत्र्यांनी या हल्ल्यांमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा नेहमीप्रमाणे दावा केला. मात्र, हिंदुस्थानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, ‘पाकिस्तान स्वतःच्या अंतर्गत समस्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी हिंदुस्थानवर बिनबुडाचे आरोप करत आहे. त्याऐवजी त्यांनी बलुचिस्तानमधील लोकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.’
अमेरिकेचा निषेध
अमेरिकेने बलुचिस्तानातील या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ ही अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली असून, अशा कठीण प्रसंगी वॉशिंग्टन पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असला तरी पाकिस्तानचा सर्वात मागासलेला प्रांत आहे. गेल्या अनेक दशकांपासून येथील लोक स्वायत्तता आणि संसाधनांवर हक्कासाठी संघर्ष करत आहेत, ज्याचे रूपांतर आता तीव्र हिंसक बंडखोरीत झाले आहे.
























































