
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा शहर भीषण आत्मघाती हल्ल्याने हादरले. क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ एका एक्स्प्रेसवर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला असून 82 जण जखमी झाले आहेत. त्यात रेल्वेतील प्रवाशांची संख्या जास्त आहे. स्फोट एवढा भीषण होता की, एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
प्राप्त माहितीनुसार, क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवला. दहशतवाद्यांनी जाफर एक्स्प्रेसला लक्ष्य केले होते. क्वेटातील चमन फाटकजवळ जाफर एक्स्प्रेस जात असतानाच स्फोट घडवण्यात आला. स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. रेल्वे मार्गावर आग लागली, डबे रेल्वे फाटक तोडून रस्त्याच्या बाजूने पडले. स्फोटामुळे जाफर एक्स्प्रेसचे डबे आणि रस्त्यावर जवळपासच्या गाडय़ांनाही आग लागली. आजूबाजूच्या घरांचे मोठे नुकसान झाले.
स्फोटानंतर जवळपासचे नागरिक मदतीसाठी धावले. पोलीस, अग्निशमन दल, आपत्कालीन बचाव पथक तसेच इतर सुरक्षा दलांचे कर्मचारी घटनास्थळी धावले. रेल्वे डब्यांवर चढून आग विझवण्यात आली. त्यानंतर काही मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच अनेक जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही
आत्मघाती हल्ल्यानंतर बलुचिस्तानमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. हा दहशतवादी हल्ला मानून तपास सुरू करण्यात आला आहे. क्वेटा शहर हे बलुचिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानात बलुचिस्तानला मुक्त करण्यासाठी लढणाऱया बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने हा हल्ला केल्याचा संशय आहे. यापूर्वीदेखील जाफर एक्स्प्रेसला अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने ही एक्स्प्रेस हायजॅक केली होती. त्यावेळी 214 प्रवासी आणि सुरक्षा दलाच्या 30 कर्मचाऱयांना ठार केल्याचा दावा या संघटनेने केला होता.























































