
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार आणि नागरिकविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील कामगारांनी पुकारलेल्या लाक्षणिक संपाला अनेक राज्यांत चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला. बँक व्यवहार ठप्प झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईत पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. कोल्हापूर, नगर, सांगली, साताऱ्यात शाळा-महाविद्यालये बंद होती. सरकारी कार्यालये आणि कर्मचाऱ्यांनी संपात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पुणे, पिंपरी- चिंचवडसह सर्वत्र मोर्चे निघाले, निदर्शने करण्यात आली. दरम्यान, केरळ, आसाम, ओडिशा येथे संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. आसाम, ओडिशातही जनजीवन ठप्प झाले.
मोदी सरकारने 44 कामगार कायद्याचे विलिनीकरण विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये मोठा असंतोष आहे. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण बंद करा, बँका, रेल्वे तसेच संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे विलीनीकरण थांबवा आदी विविध मागण्यांसाठी 25 कोटी कामगारांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, भाकप, शेकाप या पक्षांशी सलग्न कामगार संघटना, एलआयसी, बीएसएनएल, नागरी उड्डाण, पोर्ट ट्रस्ट, बँकिंग क्षेत्रातील मोठय़ा संघटनांनी संपात सहभाग घेतला.
‘एटीएम’मध्ये खडखडाट
राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नईसह अनेक महानगरांमध्ये एटीएममध्ये खडखडाट होता. बँका बंद आणि एटीएममध्ये पैसे नाहीत यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली.
शिक्षक संपावर, विद्यार्थी वर्गावर
घाटकोपर येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मल्टिपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये संपामुळे सकाळच्या सत्रात शाळेत एकही शिक्षक हजर न झाल्याने विद्यार्थ्यांनीच शाळा सुरू केली. दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी एकत्र येऊन वर्ग वेळापत्रकाप्रमाणे वर्ग चालविले. या शाळेत केजी ते महाविद्यालयापर्यंतच्या वर्गात प्रत्येकवर्षी 5,500 हून अधिक विद्यार्थी शिकतात. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरद फाटक, मुख्याध्यापिका फरिदा सनदे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग सुरू ठेवले. शिक्षकांच्या अनुपस्थितीत 36 विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली.
संपकाळात शूटिंग सुरळीत
कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या सेटवर झालेला नसून शूटिंग सुरळीत पार पडले. द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज या संघटनेने सर्व सदस्य नेहमीप्रमाणे कामावर हजर राहिल्याची माहिती दिली. सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे शूटिंग कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी सांगितले.
संपाचा शाळा, कॉलेजांवर कोणताही परिणाम झाला नाही. मुंबई आणि परिसरातील शाळा, कॉलेज सुरळीत सुरू होती. राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला होता. संपात सहभागी झालेल्या शिक्षकांनी शाळा न बुडवता काळय़ा फिती बांधून निषेध नोंदवला.
ठाणे, रायगड, पालघरात देशव्यापी संपाचे पडसाद
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कामगार आणि नागरिक किरोधी धोरणाच्या निषेधार्थ ठाणे, रायगड, पालघरात संप पुकारण्यात आला होता. कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा संप पुकारल्याने अनेक ठिकाणी मोर्चे व रास्ता रोको करत कामकाज बंद पाडण्यात आले. त्याचा थेट परिणाम उद्योग – व्यवसायावर झाला.
रुग्णालयातील कर्मचारी रस्त्यावर
जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी एकजुटीने संपात सहभागी झाले. त्यांनी रुग्णालयाबाहेर एकत्र येत विरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
उरणमध्ये कामकाज ठप्प
बीपीसीएल प्रकल्पातील कामगार संपात सहभागी झाल्याने कामकाज दिवसभर ठप्प होते. तहसील कार्यालय, गटविकास कार्यालय, काही बँकांचेही काम बंद होते. कामगारांनी मोटारसायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला.
अलिबागमध्ये तीन मोर्चे
जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार संघटनांनी तीन मोर्चे काढले. शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. तर बँक कर्मचारी संपात असल्याने ग्राहकांचे हाल झाले.
मुंबईत आझाद मैदानावर हजारो कामगारांनी आंदोलन केले. बँक कर्मचाऱ्यांसह अनेक क्षेत्रातील कामगार सहभागी झाले होते. मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध केला. मुंबईत पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारी कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारीही बंदमध्ये सहभागी झाले. कोल्हापूर, नगर, सांगली, सातारा येथे बंदमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकही सहभागी झाले. शाळा-कॉलेज बंद होती. मोर्चे, आंदोलने करण्यात आली. सोलापुरात हजारो यंत्रमाग कामगार संपात सहभागी झाले होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये डाव्या संघटनांमुळे कडकडीत प्रतिसाद मिळाला. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुडुचेरी येथे बंदला प्रतिसाद मिळाला.






















































