
घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. यासीन सादिक अली आणि जाकीर मूरसेदली शेख अशी त्या दोघांची नावे असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे.
सोमवारी रात्री वरिष्ठ निरीक्षक राजेश देवरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अविनाथ नडविणकेरी आणि पथक हे वांद्रे परिसरात गस्त करत होते. गस्तीदरम्यान वांद्रे तलाव येथे पोलिसांना पाहून यासिन आणि जाकीर हे पळू लागले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्या दोघांना पकडले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केले. यासीन आणि जाकीर हे दोघे पश्चिम बंगालचे रहिवासी असून ते मुंबईत वेठबिगारीचे काम करतात. बेकायदा शस्त्र्ा बाळगल्याप्रकरणी त्या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या दोघांना ते शस्त्र्ा कोणी दिले याचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत.
























































