वांद्रे शासकीय वसाहतीचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार – अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. त्यादृष्टीने या वसाहतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले.

वांद्रे शासकीय वसाहतीच्या संदर्भातील विविध मागण्यांच्या संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. या बैठकीला आमदार झिशान सिद्दिकी, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बाबा सिद्दिकी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वसाहतीतील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वांद्रे वसाहतीतील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, तोपर्यंत सध्याच्या इमारतीत सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल पुढील 15 दिवसांत सादर करण्याचे आदेशही अशोक चव्हाण यांनी दिले.