भूमिपूजन कार्यक्रमात धुडगूस; तृतीयपंथीयाविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तृतीयपंथीयाने धुडगूस घालून साडेपाच लाखांची मागणी केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी चार तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा नोंद केला.

तक्रारदार हे सुरक्षा अधिकारी म्हणून एका विकासकाच्या साईटवर काम करतात. शनिवारी त्या साईटवर भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. तेव्हा दुपारी दोन तृतीयपंथी हे रिक्षातून आले. ते जबरदस्तीने कार्यक्रमाच्या ठिकाणी शिरू लागले. तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्याना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या तृतीयपंथीयांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मालकाला बाहेर बोलवा असे त्याने तक्रारदार यांना सांगितले.

त्यानंतर एका तृतीयपंथीयाने तक्रारदार यांना साडेपाच लाख रुपये घेऊन या अन्यथा भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. तक्रारदार याने पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्यावर तृतीयपंथीयाने तेथे अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. याची माहिती त्याने वांद्रे पोलिसांना दिली. काही वेळात वांद्रे पोलीस घटनास्थळी आले. तेव्हा दोन तृतीयपंथी पुन्हा घटनास्थळी आले. पैसे न मिळाल्याने तृतीयपंथीयानी कपडे काढून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.