
वांद्रे येथील पंचतारांकित ताज लँड्स हॉटेलमधील कामगारांची दिशाभूल करून त्यांना भाजपच्या संघटनांमध्ये घेण्याचे भाजपचे मनसुबे शिवसेनेच्या शिलेदारांनी उधळून लावले आहेत. शिवसेनेकडून ताज लँड्स समोर जोरदार आंदोलन केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देण्यात आल्या.
मंगळवारी ताज लँड्स येथे भाजपने अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाची सुरुवात केली. या हॉटेलमध्ये आधीपासून भारतीय कामगार सेना आहे. असे असताना कामगारांची दिशाभूल करून भाजपच्या या संघटनेत त्यांना समाविष्ट करून घेतले जात होते. त्याविरोधात शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात शिवसेनेने ताज लँड्सबाहेर आंदोलन केले. यावेळी शिवसेना कामगार सेना चिटणीस मनोज धुमाळ व शिवसेना कामगार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप चुकीच्या पद्धतीने संघटना तयार करत असल्याचा आरोप कामगारांनी केला.
ज्या ठिकाणी ‘भारतीय कामगार सेने’ला कामगार संघटना म्हणून अधिकृत मान्यता आहे, त्याच ठिकाणी ‘अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघा’चे उद्घाटन करण्यात आल्यानंतर हा वाद उफाळून आला. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. त्यांनी भाजप-समर्थित नवीन संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करताच, भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आणि वातावरण तणावपूर्ण झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांनी आरोप केला की, कार्यक्रमात हॉटेलचे खरे कर्मचारी उपस्थित नसतानाही, नवीन संघटना बळजबरीने स्थापन केली जात आहे.
अनिल परब येताच पोलिसांनी गेट बंद केले
ताज लँड्सबाहेर आंदोलन सुरू असताना अनिल परब आले असता पोलिसांनी हॉटेलचे मुख्य द्वार बंद केले. अनिल परब यांनी पोलिसांना गेट खोलण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी चार ते पाच जणांना घेऊन आत जा असे सांगितले. मात्र अनिल परब यांनी मी माझ्या सर्व लोकांना घेऊनच हॉटेलमध्ये जाणार, असे पोलिसांना ठणकावून सांगितले.
शिवसेनेच्या घोषणांनी परिसर दणाणला
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानी, आवाज कुणाचा शिवसेनेचा, शिवसेना अंगार है… बाकी सब भंगार है, कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणांनी ताज लँड्सचा परिसर दणाणून गेला होता.


























































