हिंदुस्थानशी आम्हाला प्रॉब्लेम आहे! बांगलादेश सरकारचे काळजीवाहू प्रमुख मोहम्मद युनूस जाहीर बोलले!

‘हिंदुस्थानशी सध्या आमचा प्रॉब्लेम झाला आहे. बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाला मोदी सरकारने घेतलेला आक्षेप आणि शेख हसीना यांना दिलेला आश्रय ही कारणे त्यामागे आहेत,’ असे जाहीर वक्तव्य बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने युनूस सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. तेथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना युनूस यांनी हिंदुस्थान व बांगलादेश संबंधांवर भाष्य केले. ‘दोन्ही देशांमध्ये बिघडलेल्या संबंधांसाठी त्यांनी हिंदुस्थानला दोष दिला. ‘हिंदुस्थानशी सध्या आमचा प्रॉब्लेम सुरू आहे. कारण आमच्याकडे झालेल्या विद्यार्थी आंदोलनास त्यांनी विरोध केला होता. हिंदुस्थानी मीडिया खोटय़ा बातम्या पसरवत आहे. हसीना सरकारविरोधी विद्यार्थी आंदोलनाला इस्लामी चळवळ म्हटले जात आहे. इस्लामी कट्टरपंथीयांनी बांगलादेशचा ताबा घेतल्याचा अपप्रचार केला जात आहे. मलाही तालिबानी ठरवले जात आहे, असा आरोप युनूस यांनी केला.

‘शेख हसीना यांनी बांगलादेशात अनेक प्रॉब्लेम केले. अनेक तरुणांचे जीव घेतले. त्याच हसीना यांचा पाहुणचार हिंदुस्थान करत आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणाव आहे.

‘सार्क’वरूनही आरोप

‘सार्क’ संघटनेच्या मुद्दय़ावरही युनूस यांनी हिंदुस्थानला आरोपीच्या पिंजऱयात उभे केले. एका देशाचे राजकीय हित साधले जात नसल्याने ‘सार्कचे काम सध्या ठप्प आहे, असे युनूस म्हणाले.