
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आणखी एका विरोधकावर हल्ला करण्यात आला. नॅशनल सिटिझन्स पार्टीचे (एनसीपी) नेते मोहंमद मोतालेब शिकदर यांच्यावर घरात घुसून गोळीबार करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शिकदर हे खुलना येथे त्यांच्या घरी एका रॅलीसंदर्भात काम करत होते. त्याचवेळी काही हल्लेखोर घरात शिरले आणि शिकदर यांच्या डोक्यावर गोळी झाडली, मात्र निशाणा चुकला आणि गोळी कानाला छेदून निघून गेल्यामुळे शिकदर वाचले. उपस्थितांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
हसीना यांची सत्ता उलथवून लावणारे निशाण्यावर
गेल्या वर्षी शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावणारे हल्लेखोरांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. एनसीपी हा सत्ता उलथवून लावणाऱया विद्यार्थ्यांचा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थी नेते उस्मान हादी यांच्यावर 12 डिसेंबर रोजी गोळीबार झाला होता. त्यांचा सिंगापूर येथे उपचारादरम्यान 18 डिसेंबरला मृत्यू झाला.


























































