बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, 24 तासातील दुसरी घटना; 18 दिवसांत 6 जणांचा मृत्यू

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नरसिंदीमध्ये एक 40 वर्षीय दुकानदार शरत चक्रवर्ती मणी यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली. तर जशोरमध्ये हिंदू पत्रकार आणि फॅक्टरी मालक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या झाडून आणि गळा चिरून हत्या करण्यात आली.त्यामुळे देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तेथील हिंदूमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंदी येथील चारसिंदुर बाजारपेठेत सोमवारी रात्री शरत चक्रवर्ती मणी आपल्या दुकानात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यानंतर स्थानिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मणी हे काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातून बांगलादेशात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी अंतरा मुखर्जी आणि एक 12वर्षांचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. मणी यांचा कोणाशीही वाद नव्हता, तरीही त्यांची हत्या केल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान दुसरी धक्कादायक घटना ही जशोरच्या मणिरामपूरमध्ये घडली. येथे 45 वर्षीय राणा प्रताप बैरागी यांची हत्या करण्यात आली. राणा हे ‘बीडी खबर’ या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आणि एका आईस फॅक्टरीचे मालक होते. सोमवारी संध्याकाळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना फॅक्टरीबाहेर बोलावले आणि त्यांच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांचा गळा चिरून हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून सात काडतुसे जप्त केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकारी मोहम्मद रजिउल्लाह खान यांनी सांगितले.

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू समुदायावर सातत्याने हल्ले होत आहेत. यापूर्वी मयमनसिंह जिल्ह्यात दीपू चंद्र दास यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळला होता. तसेच, गेल्या आठवड्यात खोकन दास नावाच्या औषध विक्रेत्याचीही हत्या करण्यात आली होती. 18 दिवसांत 6 हिंदूंच्या हत्यांच्या या घटनांनी बांगलादेशातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बांगलादेशात आणखी एका हिंदूला जाळून मारण्याचा प्रयत्न